ऑनलाइन लोकमत
लास वेगास, दि. २१ - स्थानिक कार्यक्रमांमध्ये मंचावरच्या सूत्रसंचालकाने घोळ घातल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. उपस्थित पाहुण्यांचा सन्मान करताना, नावे उच्चारताना गोंधळ उडतो. उत्तम नियोजनाच्या अभावामुळे ही चूक घडते त्यामुळे या चूकीला आयोजकही तितकेच जबाबदार असतात. पण अशीच चूक 'मिस युनिव्हर्स' सारख्या स्पर्धेच्या मंचावर घडली तर.
अमेरिकेत लास वेगासमध्ये पार पडलेल्या 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेत सूत्रसंचालकाच्या चूकीमुळे चक्क विजेत्या विश्वसुंदरीऐवजी व्दितीय क्रमाकांच्या सौदर्यवतीला विजेतेपदाचा मुकूट प्रदान करण्यात आला होता. पण चूक लक्षात येताच मूळ विजेत्या सौदर्यवतीला मुकूट प्रदान करण्यात आला.
अंतिम फेरीत दाखल झालेल्या फिलिपाईन्सची पिया वर्जकैक आणि कोलंबियाची अरियादना ग्वातरेज मंचावर होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक स्टीव्ह हार्वे यांनी मिस कोलंबिया अरियादना ग्वातरेजच्या नावाची ‘मिस युनिव्हर्स’ म्हणून घोषणा केली.
परंपरेनुसार २०१४ ची मिस युनिव्हर्स पॉलिना वेगा हिने मिस कोलंबिया गुटिरेज हिला मिस युनिव्हर्सचा किताबही दिला. मात्र, त्यानंतर चूक लक्षात आली आणि ग्वातरेजकडून किताब परत घेऊन फिलिपाईन्सच्या पियाला देण्यात आला. भारताचे प्रतिनिधीत्व करणारी उर्वशी रौतेला अंतिम १५ मध्ये स्थान मिळवता आले नाही.