बैरूत: गृहयुद्धाशी झुंजत असलेल्या सीरियाच्या (Syria) उत्तरेकडील शहरातील एका हॉस्पिटलवर मिसाईल डागण्यात आले. यामध्ये दोन डॉक्टरांसह 18 जण ठार झाले आहेत. या शहरावर तुर्की समर्थकांचा कब्जा आहे. मानवाधिकार कार्यकर्ते आणि मदत गटाने याची माहिती दिली आहे. (Shelling of the rebel-held city of Afrin in northern Syria killed at least 18 people on Saturday.)
या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. हल्ला झालेल्या ठिकाणी सध्या सरकारी सैनिक आणि कुर्दचे लोक तैनात करण्यात आले आहेत. गव्हर्नर कार्यालयाने हल्ल्याच्या मागे ‘सीरियन कुर्दिश’ गटाचा हात असल्याचे म्हटले आहे. ब्रिटनमधील मानवाधिकार संघटना ‘सीरियन ऑब्जर्वेटरी फॉर ह्यूमन राइट्स’ने हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांची संख्या 18 सांगितली आहे. तर 23 लोक जखमी झाल्याचे म्हटले आहे.
विरोधकांच्या ताब्यात असलेल्या भागात आरोग्य सेवा आणि सुविधा पुरविणाऱ्या ‘सीरियन अमेरिकन मेडिकल सोसाइटी’(एसएएमएस) ने सांगितले की, आफरीन शहराच्या अल शिफा हॉस्पिटलव दोन मिसाईल डागण्यात आली. यामुळे पॉलिक्लिनिक विभाग, आयसीयू आणि डिलिव्हरी विभाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत.
या संघटनांनी हॉस्पिटलवर हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तुर्कीच्या हताय प्रांताने या हल्ल्यासाठी कुर्द समूहाला जबाबदार ठरविले आहे. दुसरीकडे कुर्द संघटना ‘सीरियन डेमोक्रेटिक फोर्सेस’ चे प्रमुख मजलूम अबादी यांनी आपला हात नसल्याचे म्हटले आहे. निष्पाप लोकांवर हल्ले करून त्यांना निशाना बनविण्याच्या हल्ल्यांचा आपण निषेध करत असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोपही केला आहे.