कीव्ह: रशियाच्या लष्कराने युक्रेनची राजधानी कीव्हवर शनिवारी पु्न्हा क्षेपणास्त्र हल्ले केले. त्यामुळे तेथील काही इमारतींचे नुकसान झाले आहे. युक्रेनमधील आणखी एका शहरावर क्षेपणास्त्रे डागण्यात आली असून त्यात दोन मुलांसह दहा जण जखमी झाले.
कीव्हचे महापौर विताली क्लिटस्को यांनी सांगितले की, या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे होलोसिव्हस्की भागात काही इमारतींना आग लागली. एक जानेवारीच्या रात्रीपासून रशियाने कीव्ह शहरावर हल्ला करणे थांबविले होते. पण आता या शहराला पुन्हा लक्ष्य करण्यात आले आहे. शनिवारी पहाटे लविव व खारकीव्ह शहरांतील काही प्रकल्प, कारखाने आदींवरही रशियाच्या लष्कराने क्षेपणास्त्रे डागली.
युक्रेनला चॅलेंजर २ हे रणगाडे व तोफखाना देण्याचा निर्णय ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सूनक यांनी घेतला आहे. चॅलेंजर २ प्रकारातील चार रणगाडे तातडीने युक्रेनला पाठविण्यात येणार असून त्यानंतर काही दिवसांनी आणखी आठ रणगाडे रवाना करण्यात येतील. (वृत्तसंस्था)