क्वालालंपूर : बेपत्ता मलेशियन विमानातील प्रवाशांच्या नातेवाईकांनी या विमानाबाबत महत्त्वपूर्ण धागेदोरे व त्याचा छडा लावण्यासाठी उपयुक्त ठरणारी माहिती देणाऱ्यास ५० लाख डॉलरचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. या विमानाची शोधमोहीम अपयशी होण्यास तीन महिने उलटल्यानंतर प्रवाशांच्या नातेवाईकांत विमानाबाबतचे सत्य दडविण्यात येत असल्याची भावना निर्माण झाली आहे. बक्षिसाच्या घोषणेने माहिती देण्यासाठी व्यापारी उड्डयन वा लष्करी जगतातील एखादी व्यक्ती समोर येईल, अशी आशा त्यांना वाटते. मलेशियाचे बोइंग विमान ७७७-२०० हे गेल्या ८ मार्च रोजी क्वालालंपूर येथून बीजिंगला जात असताना उड्डाणानंतर तासाभरातच बेपत्ता झाले होते. या विमानात पाच भारतीय, एका भारतीय वंशाच्या कॅनेडियन नागरिकासह २३९ प्रवासी होते. विमान बेपत्ता झाल्यानंतर आॅस्ट्रेलियाच्या नेतृत्वाखाली हिंदी महासागरात आंतरराष्ट्रीय शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, या मोहिमेला यश येऊ शकले नाही. तीन महिने उलटूनही विमानाचा शोध न लागू शकल्याने या विमानातील प्रवाशांचे नातेवाईक हवालदिल झाले आहेत. (वृत्तसंस्था)
बेपत्ता विमान : माहिती देणाऱ्यास तब्बल ५० लाख डॉलरचे बक्षीस
By admin | Published: June 09, 2014 4:29 AM