न्यूयॉर्क : अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ला दोन महिन्यांच्या खंडानंतर आपल्या ‘इंजेन्युटी मार्स हेलिकॉप्टर’शी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्यात यश आले आहे. नासाने फेब्रुवारी २०२१ मध्ये मंगळ मोहिमेंतर्गत ‘इंजेन्युटी’ हे छोटे हेलिकॉप्टर व ‘प्रिजर्वेंस’ हे रोव्हर लाल ग्रहावर पाठवले होते.
‘नासा’च्या मंगळ अंतराळ मोहिमेची नियंत्रक असलेल्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीचा (जेपीएल) २६ एप्रिल रोजी १.८ किलो वजनी इंजेन्युटीसोबतचा संपर्क तुटला होता. त्या दिवशी दोन मिनिटांत ११९१ फूट उड्डाण करून इंजेन्युटी उतरल्यानंतर ते गायब झाले होते. लाल ग्रहाचा हा भाग खूप खडकाळ आहे. त्यामुळे येथे मोहीम राबवणे खूप कठीण असते. (वृत्तसंस्था)
लाल ग्रहाबाबत मिळणार महत्त्वाची माहिती ‘इंजेन्युटी मार्स हेलिकॉप्टर’ला मंगळाची छायाचित्रे नासाला पाठवायची असून, रोव्हरला मंगळाच्या पृष्ठभागाचे नमुने गोळा करायचे आहेत. एवढे दिवस हेलिकॉप्टरचा संपर्क खंडित झाल्याबद्दल नासाने सांगितले की, हेलिकॉप्टर एखाद्या मोठ्या टेकडीच्या मागे आले असावे, त्यामुळे त्याचा रोव्हरशी संपर्क होऊ शकला नाही. आता पुन्हा संपर्क प्रस्थापित झाला आहे.