ऑनलाइन लोकमत
काठमांडू, दि. २४ - पश्चिम नेपाळकडील पर्वत रांगांमध्ये बेपत्ता झालेल्या विमानाचे अवशेष सापडले असून विमानातील सर्व प्रवासी मृत्यूमुखी पडल्याचे नेपाळच्या पर्यटन मंत्र्यांनी स्पष्ट केले.
तारा एअरच्या ' दि ट्विन ऑटेर ' या विमानाने बुधवारी सकाळी पोखरा येथून जोमसोमच्या दिशेने उड्डाण केले, मात्र अवघ्या काही वेळातच विमानाचा संपर्क तुटला आणि ते बेपत्ता झाले. या विमानात १८ प्रवासी व ३ क्रू मेंबर्स असे एकूण २१ जण प्रवास करत होते.
नेपाळच्या पर्वतरांगांमध्ये विमान बेपत्ता झाल्याचे वृत्त येताच विमानाच्या शोधासाठी तीन हेलिकॉप्टर पाठवण्यात आली तसेच बचावकार्यासाठी टीमदेखील पाठवण्यात आली. मात्र धुक्यामुळे शोधकार्यात अडथळा येत असल्याची माहिती नेपाळ लष्कराच्या अधिका-याने दिली. अखेर दुपारच्या सुमारास नेपाळच्या पर्यटन मंत्र्यांनी या विमानाचे अवशेषच सापडल्याचे सांगत सर्व प्रवासी मृत्यूमुखी पडल्याचे स्पष्ट केले. विमानातील प्रवाशांमध्ये दोन परदेशी नागरिकांचा तसेच दोन लहान मुलांचा समावेश होता.
हरिहरी योगी या पोलीस अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार काही रुपशे गावातील काही स्थानिक लोकांनी मोठा स्फोट झाल्याचं ऐकल्याची माहिती मिळाली होती. त्याठिकाणीदेखील शोध सुरु होता. विमान प्रवास करत असलेल्या रस्त्यात कोठेच लॅडींगसाठी जागा नसल्याने विमानाचा अपघात झाल्याची दाट शक्यता विमानतळ अधिकारी योगेंद्र कुंवर यांनी दर्शवली होती.