माए साई - थायलंडच्या गुहेत अडकलेल्या 12 मुलांची सुटका करण्यात आली आहे. गेल्या 15 दिवसांपासून नौदल कर्मचारी व डायव्हर्स यांची सुरू असलेली मोहीम आज फत्ते झाली. विशेष म्हणजे या 12 मुलांसह त्यांच्या फुटबॉल प्रशिक्षकासही गुहेतून सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. गुहेत अडकलेल्या फुटबॉल संघातील चार विद्यार्थ्यांना रविवारी बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर आज हे 'मिशन सेव्ह चाईल्ड' पूर्ण झाले आहे. अमेरिका, इस्रायल यांच्यासह भारतानेही या रेस्क्यू मोहिमेत सहभाग घेतला होता.
थायलंडच्या या गुहेतून बाहेर काढताच मुलांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार करून मगच त्यांना घरी पाठवण्यात येणार आहे. सोमवारी ज्या मुलांना गुहेतून बाहेर काढण्यात आले, त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुहेबाहेर रुग्णवाहिका तसेच हेलिकॉप्टर तयार ठेवण्यात आले होते. गेल्या 15 दिवसांपासून त्या गुहेमध्ये मुलं आणि प्रशिक्षक यांचा मृत्यूशी संघर्ष सुरू होता. जगाचे लक्ष लागलेल्या या रेस्क्यू मोहिमेचा आज शेवट झाला. त्यानंतर, गुहेबाहेर असलेल्या सर्वच मुलांच्या पालकांचा जीव भांड्यात पडला. भारत सरकारने व केबीएलने युद्ध पातळीवर हालचाल करून त्यांचे डिझाईन प्रमुख व मिरजेचे प्रसाद कुलकर्णी यांची टीम तातडीने शुक्रवारी रात्री थायलंडला रवाना केली. थायलंडला पोहोचताच या टीमने कामास सुरूवात केली आणि फ्लड पंप्स सुरू केले. पाण्याचा उपसा केल्यामुळे गुहेतील बचावकार्याला गती आली आणि 8 मुलांना दोन दिवसांमध्ये बाहेर काढणे शक्य झाले. त्यानंतर आज उर्वरीत 4 मुलांसह प्रशिक्षकासही बाहेर काढण्यात आले. एकंदरीत जगभरातून मिळालेल्या मदतीच्या सहाय्याने तब्बल 15 दिवसानंतर ही रेस्क्यू मोहीम फत्ते झाली.