कोलंबिया : अमेरिकेतील मिसौरी राज्याने कोरोना व्हायरसच्या मुद्यावरून चीनी सरकारविरोधात खटला दाखल केला आहे. यात चीनमधील अधिकाऱ्यांना दोषी ठरवण्यात आले असून महामारीच्या सुरुवातीला बिजिंगने जगाला चुकीची माहिती दिल्याचे म्हटले आहे.
हा खटला, मिसौरीचे महाधिवक्ता (अटर्नी जनरल) यांनी अमेरिकेच्या फेडरल कोर्टात दाखल केला आहे. यात, चीनमधील अधिकारी मिसौरीसह संपूर्ण जगात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंना आणि आर्थिक नुकसानाला जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. रिपब्लिकन अटर्नी जनरल एरिक शमिट यांनी एका लेखी निवेदनात म्हटले आहे, की 'चीनी सरकारने कोविड-19चा धोका आणि संसर्गाच्या बाबतीत जगाला खोटी माहिती दिली आणि कोरोना प्रसाराला आळा घालण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले नाही. यासाठी चीनला उत्तरदाई ठरवायला हवे.
कॅलिफोर्निया विद्यापीठातील हेस्टिंग्स कॉलेज ऑफ लॉमधील आंतरराष्ट्रीय कायद्याचे प्राध्यापक प्रोफेसर किमिने केटनर म्हणाले, या खटल्याचा काही परिणाम होईल की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. अमेरिकन कायद्याप्रमाणे काही प्रकरणे वगळता इतर देशांविरोधात खटल्यांवर बंदी घालण्यात आली आहे. तर मिसौरी डेमोक्रॅटिक पक्षाचे कार्यकर्ते लॉरेन गेपफोर्ड यांनी, हा खटला म्हणजे यावर्षी होणाऱ्या निवडणुकीसाठी करण्यात आलेली स्टंटबाजी असल्याचे म्हटले आहे.
जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या सेंटर फॉर सिस्टिम सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या मते, मिसौरीमध्ये मंगळवारी आणखी 16 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या राज्यातील मृत्यूचा आकडा आता 215वर पोहोचला आहे. तर येथे एकूण 5,963 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
आमेरिकेतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आठ लाखांवर पोहचला असून मृत्यूचा आकडा 44 हजारवर गेला आहे. येथे गेल्या 24 तासांत 2,700 हून अधिक लोकांचा कोरोनाने बळी घेतला.