लंडन : काेराेनाच्या वेगवेगळ्या लसींचे मिश्र डाेस देण्याबाबत यापूर्वी बरीच चर्चा करण्यात आली हाेती. मात्र, आता लॅंसेट मासिकामध्ये याबाबत एक संशाेधन प्रसिद्ध करण्यात आले आहे. मिश्र डाेस दिल्यामुळे अतिशय मजबूत राेगप्रतिकारशक्ती निर्माण हाेते, असे या अहवालात म्हटले आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशाेधकांच्या एका चमूने हे संशाेधन केले. त्यांनी ॲस्ट्राझेनेका किंवा फायझरच्या लसीचा पहिला डाेस घेतल्यानंतर माॅडर्ना किंवा नाेवावॅक्सच्या लसीचा दुसरा डाेस देऊन चाचणी करण्यात आली हाेती. चाचणीत १०७० जण सहभागी झाले हाेते. मिश्र डाेस दिल्यानंतर काेणामध्येही आराेग्याबाबत चिंता निर्माण झाली नाही. या सर्वांमध्ये काेराेना विषाणूविराेधात मजबूत राेगप्रतिकार शक्ती निर्माण झाल्याचे आढळून आले आहे. प्रा. मॅथ्यू स्नेप यांनी सांगितले की, संशाेधनातून चित्र स्पष्ट हाेत आहे.
ब्रिटनमध्ये ओमायक्राॅनचा सामूहिक संसर्ग
दक्षिण आफ्रिकेत सर्वप्रथम आढळून आलेल्या ओमायक्राॅन या काेराेना विषाणूच्या व्हेरिएंटचा अतिशय झपाट्याने संसर्ग वाढत आहे. विशेषत: ब्रिटनमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, २४ तासांत ओमायक्राॅनचे ९० रुग्ण आढळले आहेत. देशात सामूहिक संसर्ग सुरू झाल्याची कबुली ब्रिटनचे आराेग्यमंत्री साजिद जाविद यांनी संसदेत दिली. जाविद यांनी सांगितले की, ब्रिटनमध्ये ओमायक्राॅनचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा ३३६ वर गेला आहे. चाेवीस तासांमध्ये आढळलेल्या ९० रुग्णांपैकी इंग्लंडमध्ये ६४, स्काॅटलंडमध्ये २३ आणि वेल्समध्ये ३ रुग्ण आहेत. उत्तर आयर्लंडमध्ये अद्याप नव्या व्हेरिएंटचा एकही रुग्ण आढळलेला नाही.
हाॅंगकाँगमध्ये २१ दिवस विलगीकरण बंधनकारक
हाॅंगकाँगमध्ये नव्या काेराेना प्रतिबंधक नियमांमुळे शहराची चमक फिकी पडू शकते. शहरात दाखल हाेणाऱ्या प्रत्येकाला २१ दिवसांचे विलगीकरण बंधनकारक करण्यात आले आहे.त्यामुळे पर्यटक आणि व्यापाऱ्यांची निराशा हाेण्याची शक्यता आहे. शहरात ओमायक्राॅनने बाधित चार रुग्ण आढळल्यामुळे कठाेर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अनेक दिवसांपासून निर्बंधांमध्ये सूट देण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.