वॉशिंग्टन - कोरोना व्हायरसचा धोका सातत्याने वाढताना दिसत आहे. ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेननंतर जगभरात कोरोनाची भीती पुन्हा वाढली आहे. यातच आता लस तयार करणारी अमेरिकन कंपनी मॉर्डनाने ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनविरोधात त्यांची लस पूर्णपणे प्रभावी असल्याचा दावा केला आहे.
मॉडर्नासह अनेक औषध निर्माता कंपन्यांनी कोरोनावरील लस तयार केली आहे. ही लस अमेरिकेत दिलीही जात आहे. यातच ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन आढळल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून हा स्ट्रेन कितपत धोकादायक असेल, तयार झालेल्या लशी यावर प्रभावी ठरतील की नाही? अशा प्रकारचे अनेक प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत आहेत.
आपल्या एका निवेदनात मॉर्डनाने म्हटले आहे, की ते कुठल्याही स्ट्रेनविरोधात आपल्या लशीच्या परिणामांची पुष्टी करण्यासाठी टेस्टिंग करण्याची योजना तयार करत आहेत. एवढेच नाही, तर अमेरिकेत नुकतीच इमरजन्सी वापरासाठी मंजुरी मिळालेली त्यांची लस ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनविरोधातही प्रोटेक्टिव्ह ठरेल, आशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.
या अमेरिकन कंपनीने म्हटले आहे, की ते याची पुष्टी करण्यासाठी येणाऱ्य काही आठवड्यातच लशीची अॅडिशनल टेस्टिंग करतील. विशेष म्हणजे, कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर ब्रिटन सरकारने कठोर प्रतिबंध लागू करण्याचा विचार करत असतानाच मॉडर्नाने हा दावा केला आहे. फायझर प्रमाणेच मॉडर्नाची लसही अत्यंत कमी तापमानावर स्टोअर करून ठेवावी लागते. ही लस 94 टक्के परिणामकारक असल्याचे आढळून आले आहे.
एकीकडे संपूर्ण जग कोरोनावरील लस तयार करण्यात व्यस्त असतानाच ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोना व्हायरसच्या स्ट्रेनने सर्वांचीच चिंता वाढवली आहे. मात्र, तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की कोरोना लस नव्या स्ट्रेनवरही काम करू शकेल. त्यामुळे घाबरण्याची आवश्यकता नाही.