ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २६ - सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांशी संवाद साधणारे व त्यांच्यापर्यंत आपला संदेश पोचवणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फॉलोअर्सच्या बाबतीत 'व्हाईट हाऊस'लाही मागे टाकले आहे. ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केल्या जाणा-या (most followed) नेत्यांमध्ये मोदी चौथ्या स्थानावर असून व्हाईट हाऊस पाचव्या स्थानावर आहे. ट्विटरवर मोदींच्या फॉलोअर्सची संख्या ४९ लाख ८१ हजार ५७० इतकी असून व्हाईट हाऊसच्या फॉलोअर्सची संख्या ४९ लाख ७३ हजार ०६१ इतकी आहे.
'बर्सन-मार्स्टेलर' या फर्मने केलेल्या पाहणीतून ही माहिती समोर आली असून आधी सहाव्या क्रमांकावर असलेल्या मोदींनी चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. मोस्ट फॉलोड नेत्यांच्या यादीत पहिला क्रमांक लागतो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा, तर दुस-या क्रमांकावर आहेत पोप फ्रांसिस आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष सुशीलो युधोयोनो हे तिस-या क्रमांकावर आहेत.