ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ११- गुजरात दंगलीवरुन नरेंद्र मोदींना व्हिसा नाकारणा-या अमेरिकेने आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिकावारीसाठी औपचारिक निमंत्रण दिले आहे. दोन्ही देशांमधील संबंधाना २१ व्या शतकात निर्णयक भागीदारीचे स्वरुप देण्यासाठी मोदींसोबत काम करायची इच्छा आहे असे सांगत बराक ओबांमांनी मोदींना अमेरिका दौ-यासाठी निमंत्रण दिले आहे.
अमेरिकेचे उपपरराष्ट्र मंत्री विल्यम बर्न्स यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीत त्यांनी ओबामांचं निमंत्रण पत्र मोदींकडे दिले. या पत्रात ओबामांनी दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यावर भर दिला आहे. सप्टेंबरमध्ये मोदींनी अमेरिका दौ-यावर यावे असे औपचारिक निमंत्रण ओबामांनी या पत्राद्वारे दिले आहे. मोदींनीही हे पत्र स्वीकारले असून सप्टेंबरमध्ये होणारा अमेरिका दौरा या दोन्ही देशांसाठी ठोस निर्णय आणि मैत्रीपूर्ण संबंधांना नवीन उर्जा व गती देणारा ठरेल अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्तवली.
नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना अमेरिकेने त्यांना व्हिसा नाकारला होता. मात्र पंतप्रधानपदाचे उमेदवार झाल्यावर अमेरिकेने मोदीविरोधी भूमिकेत अमुलाग्र बदल केले. याची सुरुवात म्हणजे अमेरिकेच्या भारतातील राजदूत नॅन्सी पॉवेल यांची उचलबांगडी. पॉवेल यांनी मोदींची भेट घेण्यास विलंब केल्याने पॉवेल यांची उचलबांगडी झाली होती. यानंतर मोदींना अमेरिकेचा व्हिसा देण्याची तयारीही अमेरिकेने दर्शवली होती. पंतप्रधान झाल्यावर मोदी अमेरिकाविरोधी धोरण राबवतील अशी चर्चा होती. मात्र अमेरिका दौ-याचे निमंत्रण स्वीकारुन मोदींनी अमेरिकेसोबत काम करण्याची तयारी दर्शवली आहे.