ऑनलाइन टीम
वॉशिंग्टन, दि. १४ - राष्ट्राध्यक्षांना अमेरिकेचा ए - १ व्हिसा मिळतोच असे सूचक विधान अमेरिकेच्या गृह विभागाच्या प्रवक्त्या जेन पास्की यांनी केले आहे. त्यामुळे मोदी पंतप्रधान झाल्यास त्यांनादेखील अमेरिकेचा व्हिसा मिळेल असे संकेतच पास्की यांनी दिल्याचे सांगितले जाते.
लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पॉलमध्ये भाजपला बहुमत मिळेल असे भाकीत वर्तवले जात आहे. मोदी पंतप्रधानपदी विराजमान होतील असे सांगितले जात असतानाच अमेरिकेनेही मोदींविषयी भूमिकेत बदल केल्याचे दिसत आहे. नवीन सरकारसोबत आम्ही काम करण्यास तयार आहोत असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केले होते. त्यापाठोपाठ अमेरिकेच्या गृहविभागाच्या प्रवक्त्या जेन पास्की यांनीदेखील मोदींना व्हिसा देण्याचे संकेत दिले. मंगळवारी पास्की यांना मोदींना व्हिसा दिला जाईल का असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर पास्की म्हणाल्या, अमेरिकेच्या इमिग्रेशन अँड नॅशनालिटी अॅक्टनुसार कोणत्याही देशाच्या राष्ट्राध्यक्षाला अमेरिकेचा व्हिसा मिळतोच. याविषयी त्यांनी अधिक भाष्य करण्यात नकार दिला. 'आपण व्हिसा अर्जांवर बोलणार नसून अमेरिका भारतातील नवीन सरकारसोबत काम करण्यास तयार आहे असे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. दरम्यान, २००२ च्या दंगलीनंतर अमेरिकेने नरेंद्र मोदी यांना व्हिसा नाकारला होता.