वॉशिंग्टन - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यात आज व्हाईट हाऊसमध्ये भेट झाली. जो बायडन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतरची दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच भेट ठरली. या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांनी कोरोना, वातावरणातील बदल, व्यापार, तंत्रज्ञान आणि इतर अनेक विषयांवर चर्चा केली. दरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये आज झालेल्या भेटीमध्ये महात्मा गांधी केंद्रस्थानी राहिले. दोन्ही नेत्यांनी महात्मा गांधींच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देत त्यांना आदरांजली वाहिली.
याबाबत माहिती देताना मोदींनी सांगितले की, बायडन यांनी गांधीजींचे विचार आणि मूल्यांबाबत चर्चा केली. त्यांनी महात्मा गांधींच्या जयंतीचा उल्लेख केला. तसेच गांधीचींची विश्वस्तपणाची कल्पना ही जगासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. महात्मा गांधींना आदरांजली वाहताना बायडन म्हणाले की, आम्ही महात्मा गांधींची जयंती पुढील आठवड्यात साजरी करणार आहोत. त्यांच्या अहिंसेच्या संदेशाला आम्ही उजाळा देणार आहोत.
दरम्यान, मोदी आणि बायडन यांच्यात आज झालेल्या भेटीकडे भारत आणि अमेरिकेसह संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. व्हाईट हाऊसमध्ये पहिल्यांदाच मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांची भेट झाली. बैठकीत दोन्ही नेत्यांनी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली. कोरोना संकट, हवामान बदल, इंडो-पॅसिफिक विषयांवर भारतासोबत काम करण्याची इच्छा बायडन यांनी बोलून दाखवली. याबद्दल मोदींनी बायडन यांचे आभार मानले.