PM Modi Volodymyr Zelensky, Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्ध सुरू होऊन अडीच वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. सर्व प्रयत्न करूनही रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपण्याची चिन्हे दिसत नाही. या सगळ्यात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी भारताचे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्याबाबत भाष्य केले आहे. व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी टीओआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यात पंतप्रधान मोदींची मदत होऊ शकते. कोणत्याही वादविवादात किंवा युद्धात त्यांचा प्रभाव दिसून येतो. यातून भारताचा प्रभावही स्पष्ट दिसून येतो. त्यामुळे मोदीच हे युद्ध थांबवू शकतात.
एका मुलाखतीत एका प्रश्नाच्या उत्तरात व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी पंतप्रधान मोदी युक्रेन आणि रशिया यांच्यात चर्चा करण्याच्या शक्यतेवर आपले मत व्यक्त केले. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी भारतात चर्चा होण्याची शक्यता झेलेन्स्की यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, अर्थातच हे भारतात होऊ शकते आणि पंतप्रधान मोदी हे प्रत्यक्षात करू शकतात. मला वाटते की आपण स्वतःला तयार करणे आणि त्यानुसार तयारी करणे आवश्यक आहे. कारण युद्ध आपल्या मातीवर लढले जात आहे. आमच्याकडे एक व्यासपीठ आहे, ते म्हणजे शांतता शिखर परिषद. त्यातून या गोष्टी घडवून आणल्या जाऊ शकतात.
गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियातील कझान शहरात आयोजित १६व्या ब्रिक्स परिषदेत भाग घेतला होता. यादरम्यान त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. या संभाषणात पीएम मोदींनी पुन्हा एकदा रशिया-युक्रेन युद्धाचा उल्लेख केला. त्यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना सांगितले की, समस्या शांततेच्या मार्गानेच सोडवल्या पाहिजेत. शक्य तितक्या लवकर शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्याला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचे मोदींनी म्हटलं होते. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या मुद्द्यावर आम्ही सतत संपर्कात आहोत, आमचा विश्वास आहे की समस्या शांततेच्या मार्गानेच सोडवल्या पाहिजेत. आगामी काळातही भारत सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.