क्वालालम्पूर : मनी लाँड्रिंग आणि द्वेष पसरविणारी भाषणे करण्याच्या आरोपात भारताला हवा असलेला आरोपी झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला विचारणा केली नसल्याचे मलेशियाचे पंतप्रधान महातिर मोहम्मद यांनी मंगळवारी सांगितले. झाकीर नाईक (५३) हा २०१६ मध्ये भारतातून मुस्लिमबहुल देश मलेशियात गेला आहे.महातिर यांनी म्हटले आहे की, मोदी यांनी या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या भेटीदरम्यान आपल्याशी झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणाबाबत कोणतीही विचारणा केली नाही. दरम्यान, परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी पंतप्रधान महातिर यांच्यासोबतच्या द्विपक्षीय बैठकीनंतर माहिती देताना सांगितले होते की, मोदींनी नाईकच्या प्रत्यार्पणाबाबतचा मुद्दा मलेशियाच्या पंतप्रधानांसोबत उपस्थित केला होता.नाईकच्या प्रत्यार्पणाबाबत विचारणा केली असता महातिर यांनी मलेशियाई रेडिओ स्टेशनला सांगितले की, अनेक देश त्याला पसंत करत नाहीत. मी मोदींसोबत चर्चा केली. ते याबाबत बोलले नाहीत.नाईकने हिंदू आणि चिनी मलेशियाई लोकांविरुद्ध वर्णद्वेषी टिप्पणी केली होती. महातिर म्हणाले की, तो या देशाचा नागरिक नाही. त्याला यापूर्वीच्या सरकारने स्थायी निवासाचा दर्जा दिला आहे. स्थायी निवासी व्यक्तीकडून ही अपेक्षा नाही की, त्याने या देशाची व्यवस्था आणि राजकारण यावर टिप्पणी करावी. त्याने उल्लंघन केले आहे. आता त्याला बोलण्याची परवानगी नाही.तो दावा भारताने फेटाळलाझाकीर नाईकचा मुद्दा मोदींनी उपस्थित केला नव्हता, हा मलेशियाच्या पंतप्रधानांचा दावा भारताने फेटाळून लावला. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले की, नाईकच्या प्रत्यार्पणाचा मुद्दा व्लादिवोस्तोकमध्ये मोदी यांनी मलेशियाच्या पंतप्रधानांसमोर उपस्थित केला होता.
नाईकच्या प्रत्यार्पणावर मोदी बोलले नाहीत; मलेशियाच्या पंतप्रधानांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 3:47 AM