इस्लामाबाद : अर्णव गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. यासंदर्भातील वादात आता पाकिस्तानचेपंतप्रधानइम्रान खान यांनी उडी घेतली असून, मोदी सरकारवर टीका केली आहे. मोदी सरकार भारताचे रुपांतर वाईट देशामध्ये करत आहे, असा दावा इम्रान खान यांनी केला आहे.
अर्णव गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांचे व्हॉट्सअॅप संभाषण व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानचेपंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली. या दोघांच्या व्हॉट्सअॅप संवादात बालाकोट एअर स्ट्राइकबद्दलही उल्लेख आढळला आहे. त्यानंतर इम्रान खान यांनी या प्रकरणी भाष्य केले आहे.
सन २०१९ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेत बोलताना भारतातील फॅसिस्ट नरेंद्र मोदी सरकारने देशातील निवडणुकांसाठी बालाकोटचा वापर केला, असे सांगितले होते. एका भारतीय पत्रकाराच्या संवादातून हा नवीन खुलासा झाला आहे. हा पत्रकार त्याच्या आक्रमकपणामुळे ओळखला जातो. या संवादातून मोदी सरकार आणि भारतीय माध्यमांमध्ये असलेले चुकीच्या संबंधाचाही खुलासा झाला आहे, असे ट्विट इम्रान खान यांनी केले आहे.
पुढे केलेल्या आणखी एका ट्विटमध्ये इम्रान खान म्हणतात की, पाकिस्तानातील दहशतवादामागे भारतच आहे. गेल्या १५ वर्षांपासून भारतव्याप्त जम्मू काश्मीर आणि आमच्याविषयी चुकीची माहिती पसरवली जात आहे. या चॅटमुळे महत्त्वाच्या बाबी उघडकीस आल्या आहेत. भारतातील माध्यमांचे संबंध उघड झाले आहेत, जे आण्विक क्षेत्राला संघर्षाकडे ढकलत आहेत, असा दावा इम्रान खान यांनी केला.
पुन्हा सांगतो की, आमचे सरकार पाकिस्तान आणि मोदी सरकारचे डाव उघडे पाडत राहिले. आंतरराष्ट्रीय समुदायाने भारताला बेजबाबदार आणि लष्करी अजेंड्यापासून थांबवायला हवे. कारण मोदी सरकार संपूर्ण खंडाला एका संघर्षामध्ये ढकलू शकते, असेही इम्रान खान यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले आहे.