नवी दिल्ली : काश्मीरमधून ३७० कलम रद्द केल्यावर भारताचे यापुढेचे लक्ष पाकव्याप्त काश्मीर असल्याचे स्पष्ट आता दिसून येत आहेत. या संदर्भात पुष्टी देणारे वक्तव्य संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. भविष्यात पाकिस्तानसोबत संवाद झाला यात तो पाकव्याप्त काश्मीर याच मुद्द्यावर होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. हरियाणातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित 'जन आशीर्वाद यात्रेच्या' प्रारंभी ते बोलत होते. ही यात्रा संपूर्ण हरियाणातील ९० विधानसभा मतदार संघातून जाणार आहे. त्यात रोहतक इथे ८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या रॅलीचा समावेश आहे.
यावेळी राजनाथ सिंह म्हणाले की, ' कलम ३७० हे काश्मीरच्या विकासात अडथळा बनू पाहत होते. त्यामुळे ते हटवण्यात आले. मात्र सध्या शेजारील ही भारताने केलेली चूक आहे असे सांगत आंतराराष्ट्रीय समुदायाची दारे ठोठावीत आहे. मात्र पाकिस्तानशी संवाद झाला तर तो फक्त त्यांनी दहशतवादी संघटनांना बळ न देण्याच्या मुद्द्यावर होईल. पण आता तो संवाद पाक व्याप्त काश्मीरच्या प्रश्नावरही होणार असल्याचे ठणकवायलाही ते विसरले नाहीत.
पुढे ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारत बालाकोटपेक्षाही मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे विधान केले. याचाच अर्थ बालाकोटमध्ये भारताने काय केले हे पाकिस्तानचे पंतप्रधान पूर्ण जाणून आहेत. भारताने अणुशक्तीचा वापर करण्याच्या नियमाच्या बदलाविषयी चाचपणी केल्यावर लगेचच त्यांचे विधान आले.