हॅम्बर्ग : सिक्कीममधील घडामोडींवरून भारत-चीन दरम्यान वाढता तणाव असताना, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिगपिंग यांची शुक्रवारी अनौपचारिक भेट झाली. दोघांना एकमेकांशी हस्तांदोलनही केले, शिवाय विविध मुद्द्यांवर चर्चाही केली. दोन्ही नेते जी-२० शिखर परिषदेसाठी आले आहेत.त्या दोघांत विविध प्रश्नांबाबत चर्चाही झाली, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. मात्र, याहून अधिक सांगण्यास नकार दिला. ब्रिक्स सदस्य राष्ट्र प्रमुखांच्या बैठकीत मोदी यांनी ब्रिक्स सदस्य देशांना दहशतवादाचा मुकाबला करण्यास आणि जागतिक आर्थिक वृद्धीला गती देण्याकामी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. बैठकीला रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीनसह अन्य पाच देशांचे प्रमुखही उपस्थित होते. या वेळी या नेत्यांनी चीनमध्ये होणाऱ्या ९ व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या तयारीवरही चर्चा केली. (वृत्तसंस्था)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणांनंतर या बैठकीचा समारोप करताना, चीनचे अध्यक्ष शी जिगपिंग यांनी भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्सने केलेल्या प्रगतीबद्दल भारताची प्रशंसा केली. ब्रिक्स अध्यक्षपदाचा भारताचा कार्यकाळ संपल्यानंतर, ब्रिक्सचे अध्यक्षपद चीनकडे सोपविण्यात आले आहे.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिगपिंग यांची भेट नियोजित नव्हती. सध्याच्या तणावाच्या वातावरणात दोघा नेत्यांची भेट होणार नाही, असे चीनने गुरुवारी जाहीर केले होते. त्यानंतर, दोघा नेत्यांची भेट ठरलेलीच नाही, असे भारतानेही स्पष्ट केले होते, तरीही मोदी व जिनपिंग भेटले.
मोदी-जिनपिंग यांची भेट; भारताची केली प्रशंसा
By admin | Published: July 08, 2017 4:35 AM