टोकियो : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांच्यासह प्रसिद्ध शिंकनसेन बुलेट ट्रेनद्वारे प्रवास केला. भारतात मुंबई-अहमदाबाद मार्गावर बुलेट ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. मोदी व अबे यांनी टोकियो ते कोबे हा २४० कि.मी. प्रति तास ते ३२० कि.मी. प्रति तास वेगाने धावणाऱ्या रेल्वेतून प्रवास केला. कोबे हे जपानच्या ओसाका प्रांतातील शहर आहे. मोदींनी रेल्वेत अबे यांच्यासोबत चर्चा करतानाची आपली छायाचित्रे टिष्ट्वटरवर टाकली. ‘पंतप्रधान अबे यांच्यासोबत कोबेला जात आहे. आम्ही शिंकनसेन बुलेट ट्रेनमध्ये आहोत,’ असे टिष्ट्वट मोदींनी केले. ‘कोबेला जाणाऱ्या शिंकनसेन बुलेट ट्रेनमध्ये मोदी आणि अबे. अनोख्या रेल्वे प्रवासात अनोखी मैत्री’, असे टिष्ट्वट परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी केले. मुंबई आणि अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी रेल्वे कॉरिडॉर उभारण्याचे काम २०१८मध्ये सुरू होणार असून, २०२३मध्ये पहिली रेल्वे धावणार आहे. भारतातील बुलेट ट्रेन प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचे काम या वर्षअखेरीस सुरू होईल, असे अबे यांनी शुक्रवारी मोदींसोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत म्हटले होते. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभय देशांच्या संबंधांमधील नवा पैलू दर्शवितो, असे सांगून बुलेट ट्रेनमुळे भारताच्या आर्थिक विकासाला उत्तेजन मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती. तत्पूर्वी, मोदी बुलेट ट्रेन प्रवासासाठी टोकियो स्टेशनवर पोहोचले तेव्हा स्वरूप यांनी भारत, जपानच्या संबंधांना गतिमान करीत मोदी व अबे शिंकनसेनच्या सफरीसाठी टोकियो स्थानकावर पोहोचले, असे टिष्ट्वट केले होते. जपानमध्ये उच्च गती रेल्वेप्रणाली शिंकनसेन १९६४मध्ये अस्तित्वात आली होती. (वृत्तसंस्था)
मोदींनी अबेंसह बुलेट ट्रेन सफरीचा लुटला आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2016 3:23 AM