ऑनलाइन लोकमत
टोकयो (जपान), दि. १ - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे जुने मित्र असल्याचे सांगताना जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांनी भारत व जपानचे अनेक शतकांचे संबंध आणखी दृढ झाल्याचे सांगितले. दक्षिण आशियाच्या बाहेर भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच भेट असून त्यासाठी त्यांनी जपानची निवड केली हे त्यांचा निर्धार दाखवते असे आबे म्हणाले. भारत व जपानचे संबंध सांस्कृतिकदृष्ट्या, व्यावसायिकदृष्ट्या बळकट व्हावेत यासाठी पुढाकार घेण्याची आपली तयारी असल्याचे आबे म्हणाले.
संरक्षण क्षेत्रामध्ये भारत व जपान सहकार्य करेल असे सांगताना दोन्ही देशांचे संबंध या क्षेत्रातही दृढ होतील असे एब म्हणाले. भारताला संरक्षण सिद्ध होण्यासाठी लागणारी मदत जपान करेल असे सांगतानाच येत्या पाच वर्षांमध्ये भारतामधली गुंतवणूक दुप्पट करताना येत्या पाच वर्षांमध्ये ३.५ लाख कोटी येनची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे आबे म्हणाले. ३.५ लाख कोटी येन म्हणजे सुमारे ३५ अब्ज डॉलर्स किंवा २.१० लाख कोटी रुपये होतात.
अणूकार्यक्रमाच्या संदर्भातही बोलणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आणि या विषयावरीह मोदींशी बोलणी झाल्याचे ते म्हणाले. दोन्ही देशांतील करारांवर लवकरात लवकर कार्यवाही या मताचे आपण व मोदी दोघेही असल्याचे आबे म्हणाले.
दोन्ही देशांमध्ये मनुष्यबळाची देवाणघेवाण वाढवण्याचे संकेत एब यांनी दिले असून सागरी सुरक्षा, विद्यार्थ्यांचे शिक्षण आदी क्षेत्रांमध्ये आदानप्रदानावर भर देण्यात येणार आहे. धोरणात्मकदृष्ट्या आर्थिक व संरक्षण क्षेत्रामध्ये सहकार्य दोन्ही देशांमध्ये होईल असे आबे यांनी सांगितले.
भारताच्या विकासात जपानचे योगदान - मोदी
शिंझो आबे यांचे आभार मानताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारताच्या विकासात जपानचे योगदान महत्त्वाचे असून भविष्यातही हे संबंध आणखी दृढ व्हायला हवेत. भारत आणि जपान हे दोन्ही देश केवळ आशियाच नव्हे तर जगभरात शांतता आणि स्थिरता निर्माण करण्यात मोलाची भूमिका बजावू शकतात. जपानने भारताच्या काही कंपन्यांवरील निर्बंध मागे घेतले, गंगानदीच्या शुद्धीकरणासाठी मदत करायची तयारी दर्शवल्याचे मोदींनी सांगितले.