लाहोर, दि. 31 - पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानी लष्कराबद्दल जी भाषा वापरतात तशाच भाषेचा प्रयोग करुन माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पाकिस्तानी लष्कराचा अपमान केला आहे असा आरोप तेहरीक-इ-इन्साफ पक्षाचे सर्वेसर्वा इमरान खान यांनी केला आहे. खान यांच्या आरोपामागे मागच्यावर्षी डॉनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा संदर्भ होता. दहशतवाद्यांविरुद्ध पाकिस्तानी लष्कर कारवाई करत नसल्याने शरीफ सरकार नाखूष असल्याचे वृत्त डॉनने प्रसिद्ध केले होते.
नवाझ शरीफ यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरुन गच्छंती झाल्यानंतर आभार व्यक्त करण्यासाठी इमरान यांनी रविवारी जाहीर सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी हे आरोप केले. भ्रष्टाचार लपवण्यासाठी नवाझ शरीफ वेळप्रसंगी पाकिस्तानच्या हिताशीही तडजोड करतील आणि शत्रूंशी हातमिळवणी करतील असा आरोप इमरान यांनी केला.
डॉनच्या वृत्ताचा हवाला देऊन इमरान खान म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानी लष्कराबद्दल जी भाषा वापरतात तशीच कृती नवाझ शरीफ यांनी केली. यापेक्षा बेईमानी काय असू शकते ? असा सवाल त्यांनी केला. आपल्याच लष्कराचा अपमान करणारा नेता मी पाहिलेला नाही असे इमरान खान म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरीफ यांच्यामध्ये काहीही फरक नाही असे इमरान खान काही महिन्यांपूर्वी एका सभेत म्हणाले होते.
पनामा प्रकरणात नवाझ शरीफ यांचे नाव आल्यापासून इमरान खान यांनी पाकिस्तानात त्यांच्याविरुद्ध आघाडी उघडली होती. पुढच्यावर्षी पाकिस्तानात होणा-या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत हा विषय तापवत ठेऊन लाभ उठवण्याची त्यांची रणनिती आहे. नामा प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर इमरान खान यांनीही नवाज शरीफ यांच्यावर टीकेची झोड उठवली. ही तर फक्त सुरुवात आहे, असं म्हणत त्यांनी शरीफ यांना सूचक इशारा दिला.
संयुक्त तपास पथकानं 60 दिवसांत जे केले ते कोणालाही शक्य नव्हतं. या निर्णयानंतर स्पष्ट झालं आहे की, पाकिस्तानकडे भ्रष्टाचार रोखण्याची क्षमता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे यावर शिक्कामोर्तब झालं आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे लोकांमध्ये न्याय व्यवस्थेप्रति विश्वास निर्माण झाला आहे. मी पाकिस्तानमधील लोकशाही, गरिबांच्या सशक्तीकरणासाठी संघर्ष केल्याचंही ते म्हणाले आहेत. शरीफ यांच्या परिवाराला मी 40 वर्षांपासून ओळखतो आहे. माझी त्यांच्या परिवाराशी कोणतंच वैयक्तिक वैर नाही असे इमरान खान म्हणाले होते.