ऑनलाइन लोकमतन्यूजर्सी, दि. १६ - पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात आर्थिक सुधारणा आणि प्रशासकीय बदल घडवून देशाला विकासाच्या वाटेवर नेत आहेत. त्यांच्यासारखेच काम अमेरिकेतही करण्याची गरज आहे असे सांगत डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. मी नरेंद्र मोदी यांचा चाहता असून त्यांच्यासोबत काम करण्यासाठी मी इच्छुक आहे असेही ते म्हणाले. रिपब्लिकन हिंदू कोएलिशनच्या वतीने आयोजीत एका चॅरीटी कार्यक्रमात भारतीय वंशाच्या अमेरिकी मंडळींसमोर ट्रंप बोलत होते. ते म्हणाले, भारत हा जगातला एक शक्तीशाली लोकशाही देश आहे. तसेच, तो आमेरिकेचा सहयोगी देशही आहे. आपण राष्ट्राध्यक्ष झालो तर, अमेरिकेचे भारतासोबतचे संबंध सौहार्दाचे असतील. तसेच, दोन्ही देशांतील व्यापारालाही चांगलीच चालणा मिळेल. जेणकरून दोन्ही देशांचे भविष्य अभूतपूर्व असेल. काश्मीरी पिंडित आणि दहशतवादाबद्दल बोलताना ट्रंप म्हणाले, मी हिंदू आणि भारत यांचा प्रशंसक आहे. जर मी निवडून आलो तर, भारतीय हिंदूंना व्हाईट हाऊसमध्ये एक सच्चा दोस्त मिळेल. आपण १९ महिन्यांपूर्वी भारतात गेलो होतो तेव्हा आपल्याला लोकांचे प्रेम मिळाले. यापूढेही आपण भारतात जाऊ इच्छितो, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.दरम्यान, अमेरिकन पहिले अशी भूमिका मांडणा-या ट्रम्प यांनी या कार्यक्रमात मात्र भारतीय मतदारांना आकर्षित करण्याचा जोरदार प्रयत्न केला. दहशतवादाविरोधात भारत आणि अमेरिकेचे एकच उद्दीष्ट आहे असे सांगत ट्रम्प यांनी २००८ मधील मुंबई हल्ल्याचाही उल्लेख केला. मुंबई हे माझे आवडते शहर असल्याचे त्यांनी सांगितले.