ऑनलाइन लोकमत
बर्लिन, दि. 30- अभिनेत्री प्रियांका चोप्रा बेवॉच या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सिनेमाचं सगळीकडेच जोरदार प्रमोशन सुरू आहे. सध्या पीसी बर्लिनमध्ये सिनेमाचं प्रमोशन करते आहे. सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असणाऱ्या पीसीची बर्लिनमध्ये एका खास व्यक्तीशी भेट झाली आहे. तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रियांका चोप्राची भेट घेतली आहे. मोदींनी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून प्रियांकाची भेट घेतली आहे. प्रियांकाने मोदींसोबतचा फोटो इंस्टाग्राम आणि ट्विटरवर शेअर करून भेटीबद्दलची माहिती दिली आहे.
"बर्लिनमध्ये मी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी असण्याचा सुंदर योगायोग जुळून आला. तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून मला आज सकाळी भेटल्याबद्दल तुमचे खूप आभार", असं ट्विट अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने केलं आहे. तसंच इंस्टाग्रावरसुद्धा प्रियांकाने मोदींसोबतचा फोटो शेअर करून भेटीबद्दल मोदींचे आभार मानले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रियांका चोप्रा या दोघांमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली असेल याबद्दल आता उत्सुकता आहे. पंतप्रधान मोदी सध्या चार देशांच्या दौऱ्यावर आहेत. 29 मे रोजी मोदी जर्मनीमध्ये दाखल झाले होते. मोदींनी तिथे जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांची भेट घेतली. मर्केल यांच्याबरोबर विविध मुद्यांवर समाधानकारक चर्चा झाल्याचं मोदींनी टि्वट करुन सांगितलं आहे.
पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, मोदी आणि मार्केल यांच्यामध्ये तीन तास चर्चा झाली आहे. तीन तासांच्या चर्चेत स्मार्ट सिटी, कौशल्य विकास, स्वच्छ ऊर्जा तसंच भारतात नव्याने लागू होणार असलेल्या जीएसटीबद्दल चर्चा झाली आहे.
बेवॉच या सिनेमातून अभिनेत्री प्रियांका चोप्रा हॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. 2 जून रोजी हा सिनेमा भारतात प्रदर्शित होणार आहे. खरंतर बेवॉच या सिनेमाला सिने समिक्षकांनी चांगले रिव्ह्यू दिले नाही पण सिनेमातील प्रियांकाच्या कामाचं कौतुक होत आहे. पीसीला हॉलिवूडपटात पाहण्यासाठी तिचे फॅन्सही आता उत्सुक आहेत.
Thank you for taking the time to meet me this morning @narendramodi Sir. Such a lovely coincidence to be in #berlin at the same time.