नवी दिल्ली, दि. 14 - भारत आणि पाकिस्तानमधील संबंध हे आतापर्यंतच्या सर्वात वाईट पातळीवर पोहोचले आहेत. फाळणीचा निर्णय योग्यच होता हे नरेंद्र मोदी सरकारने सिद्ध केलंय, असं विधान फाळणीला 70 वर्ष पूर्ण होत असताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तान तहरीक़-ए-इंसाफ़ (पीटीआई) पार्टीचे नेता इम्रान खान यांनी केलं आहे.
'माझी पिढी फाळणीनंतरची पहिलीच पिढी होती. पाकिस्तानचं वय अवघं 5 वर्ष असताना माझा जन्म झाला, त्यामुळे फाळणीचं दुःख मला चांगलं माहितीये. आम्ही मोठे होत असताना आमचे आई-वडील फाळणीबाबत बोलताना, भारतात समान संधी व समान अधिकार मिळणार नाहीत असं म्हणायचे, आता नरेंद्र मोदींनी तो विचार योग्य होता हे सिद्ध केलंय. फाळणीचा निर्णय योग्यच होता हे नरेंद्र मोदी सरकारने सिद्ध केलं आहे' असं इम्रान खान म्हणाले.
बीबीसीने याबाबत वृत्त दिलं आहे. भारत आणि पाकिस्तानमधील संबंध हे आतापर्यंतच्या सर्वात वाईट पातळीवर पोहोचले आहेत, असं मला वाटतं. भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी याला कारणीभूत आहेत. मोदींची विचार सांप्रदायिक आहे आणि त्यांचे कट्टरपंथी हिंदूंसोबत संबंध आहेत. ते गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही त्यांची मुस्लिमांविरोधी प्रतिमा समोर आली होती, असं इम्रान खान म्हणाले.
मोदी आणि भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी दोन्ही एकाचं पक्षाचं प्रतिनिधित्व करतात. वाजपेयी पंतप्रधान बनले त्यावेळी दोन्ही देशांमध्ये संबंध ताणले जाणार अशी चिंता होती. पण त्यांच्या कार्यकाळात दोन्ही देशांचे संबंध चांगले राहिले. मोदींना चांगला जनादेश मिळाला आहे. दोन्ही देश अजून जवळ येऊ शकत होते पण मोदींनी निराशा केली. मोदींनी केवळ पाकिस्तानलाच नाही तर भारतीय मुसलमानांनाही निराश केलं आहे. उदारवादी विचार असणा-या सगळ्यांचीच मोदींनी निराशा केली, असं इम्रान खान म्हणाले.