बिश्केक (किरगिझस्तान) : शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेसाठी येथे आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत झालेल्या भेटीत द्विपक्षीय संबंध बळकट करण्यावर चर्चा करण्याखेरीज भारतात होणाऱ्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा मुद्दाही मांडला.
बैठकीनंतर परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी सांगितले की, दहशतवादाचा पुरस्कार बंद करून विश्वासाचे वातावरण तयार झाल्याखेरीज कोणतीही चर्चा शक्य होणार नाही, हे भारताने पाकिस्तानला वारंवार सांगितले आहे; पण प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही, असे मोदी यांनी शी जिनपिंग यांना सांगितले.शी यांना मोदींनी भारत भेटीचे निमंत्रण दिले व ते त्यांनी औपचारिकपणे स्वीकारले. मोदी भेटण्याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही शी पिंग यांची भेट घेतली होती. याच परिषदेसाठी आलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांचीही भेट घेऊन मोदी यांनी चर्चा केली.