ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 25 - बहुचर्चित अमेरिका दौऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र वॉशिंग्टनमध्ये दाखल झाले आहेत. मोदी आज विविध कार्यक्रमात सहभाग घेणार असून, उद्या मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, ट्रम्प यांनी मोदींच्या स्वागतासाठी ट्विट केले आहे. ट्रम्प यांनी आपल्या ट्विटमध्ये मोदींचा उल्लेख "खरा मित्र" असा केला आहे.
पोर्तुगालचा दौरा आटोपल्यावर भारतीय वेळेनुसार आज सकाळी मोदी वॉशिंग्टनमध्ये पोहोचले. तेथे अमेरिकेतील भारताचे राजदूत नवतेज सरना आणि त्यांची पत्नी अविना सरना तसेच अमेरिकेच्या भारतातील राजदूत मेरी के लॉस कार्लसन यांनी मोदींचे स्वागत केले. मोदींच्या स्वागतासाठी जॉइंट बेस अँड्र्यूज विमानतळावर भारतीय समुदायाचे नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. 2014 साली भारताच्या पंतप्रधानपदाची सूत्रे सांभाळल्यापासून मोदींचा हा पाचवा अमेरिका दौरा आहे.
सोमवारी मोदी व ट्रम्प यांची भेट होणार असून, त्यांच्यात तब्बल पाच तास चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येते. मोदी यांच्या सन्मानार्थ ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये सोमवारी रात्री भोजन समारंभ आयोजित केला आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर परदेशी पाहुण्यासाठी व्हाइट हाउसमध्ये आयोजित करण्यात येणारा हा पहिला भोजन समारंभ आहे. एच१बी व्हिसाचा विषय चर्चेचा भाग नसेल, असे व्हाइट हाउसने स्पष्ट केले आहे.
दोन्ही नेते दहशतवाद, भारताच्या संरक्षण क्षेत्रातील आधुनिकीकरण व त्यासाठी अमेरिकेची मदत, संबंधांना बळकटी, व्यापारात वाढ यावर चर्चा करतील. त्याची माहिती निवेदनाद्वारे सर्वांना दिली जाणार आहे. ट्रम्प व मोदी माध्यमांच्या प्रतिनिधींनाही भेटणार आहेत. त्यानंतर प्रतिनिधी पातळीवरही दोन देशांमध्ये चर्चा होणार आहे आणि अमेरिकन बड्या कंपन्यांच्या सीईओबरोबरही मोदी यांची भेट ठरली आहे.
अमेरिका दौऱ्याचा प्रमुख हेतू दोन देशांमधील संबंध बळकट करणे हा असून, त्या संबंधांचा फायदा भारताला आणि जगालाही होईल, असे मोदी यांनी दौरा सुरू करण्यापूर्वी टिष्ट्वटद्वारे नमूद केले आहे.
Old partnerships, new friendships - PM @narendramodi arrives at Joint Base Andrews, Washington DC for 1st meeting with President Trump pic.twitter.com/pjOj5pNsU1— Gopal Baglay (@MEAIndia) June 25, 2017