ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - काबूलहून थेट दिल्लीत परत येण्याऐवजी लाहोरला भेट देऊन येणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौ-यामुळे अनेक तर्क-वितर्क वर्तवले जात असतानाच मोदी-शरीफ यांची ही भेट उत्स्फूर्त नसून पूर्वनियोजित असल्याचे बोलले जात आहे. शरीफ यांच्या वाढदिवस आणि ख्रिसमसचा मुहुर्त साधून झालेल्या या भेटीमागे प्रसिद्ध उद्योगपती 'सज्जन जिंदाल' यांची प्रमुख भूमिका असल्याची चर्चा सुरू आहे. ‘जेएसडब्ल्यू स्टील’ या भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या पोलाद कंपनीचे अध्यक्ष असलेले जिंदाल यांनीच सार्क परिषदेदरम्यान काठमांडूत मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात तासभर चर्चा घडवून आणली, अशा बातम्या काही दिवसांपूर्वी होत्या. त्यामुळे काल झालेल्या भेटीमागेही तेच असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे काल मोदी लाहोर येथे शरीफ यांच्या भेटीसाठी उतरले असताना, त्यापूर्वीच जिंदाल हेही शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लाहोरमध्ये दाखल झाले होते, असे वृत्त आहे.
दोन दिवसांच्या रशिया दौ-यावर गेलेल्या पंतप्रधान मोदी यांचा तेथून अफगाणिस्तान आणि मग दिल्लीत आगमन असा दौरा आधीच ठरला होता. मात्र काल अफगाणिस्तानमधील संसदेच्या इमारतीच्या उद्गाटनानंतर मोदींनी अचानक धक्का देत भारतात परत येण्यापूर्वी आपण लाहोरला उतरून शरीफ यांना शुभेच्छा देणार असल्याचे ट्विटरवरून जाहीर केले. खुद्द परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराजदेखील यांनाही या भेटीची यत्किचिंतही पूर्वकल्पना नव्हती. लाहोर विमानतळावर शरीफ यांनी मोदींचे केलेलं स्वागत, त्यांची गळाभेट, शरीफ यांनी केलेले आदरातिथ्य व त्यानंतर मोदी -शरीफ यांची तासभर झालेली भेट यामुळे विविध चर्चा सुरू असून मोदींची ही भेट अकस्मात नव्हे तर पूर्वनियोजित असल्याची चर्चा सुरू झाली.
सज्जन जिंदाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध असून त्यांनीच या दोन्ही नेत्यांच्या भेटीतील महत्त्वाची भूमिका निभावली अशी चर्चा सुरू आहे. ट्विटरवरून मोदींनी शरीफ यांना शुभेच्छा दिल्यानंतर तासाभरातच जिंदाल यांनी आपण शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लाहोरमध्ये असल्याचे ट्विट केले होते. त्यामुळे भारत -पाकिस्तान चर्चेतील नवे सूत्रधार जिंदाल असतील, असे बोलले जात आहे.