ऑनलाइन लोकमत
टोकियो, दि. १ - जपान दौ-यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी टोकियोतील शाळकरी विद्यार्थ्यांना कृष्णाची कहाणी सांगितली. बासरीमध्ये पशूपक्ष्यांनाही आकर्षित करण्याची शक्ती असते असे सांगताना मोदींनी श्रीकृष्णाचे उदाहरण दिले.
नरेंद्र मोदी सध्या पाच दिवसांच्या जपान दौ-यावर असून भारतीय उपखंडाबाहेर मोदींचा हा पहिलाच दौरा आहे. या दौ-यातही मोदींनी त्यांची छाप पाडली आहे. सोमवारी मोदींनी टोकियोतील एका शाळेत भेट दिली. या शाळेतील संगीताच्या तासाला मोदींनी हजेरी लावली. सात ते आठ वर्षांच्या या लहान मुलांनी संगीताच्या तालावर मोदींचे जोरदार स्वागत केले. मोदींसाठी स्वागत गीताचे गायन केल्यावर मुलांनी बासरीवादनही केले. यानंतर संगीताच्या वर्गात चक्क मोदी सरांचा तास रंगला. बासरीत पशूपक्ष्यांना आकर्षित करण्याची शक्ती असते असे मोदींनी सांगताच उपस्थित विद्यार्थ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. यावर मोदींनी भारतीय पुराणाचा दाखला दिला. मोदी म्हणाले, भारतातील पौराणिग ग्रंथांमध्ये श्रीकृष्णाचा उल्लेख असून यामध्ये कृष्ण त्यांच्या गायींना आकर्षित करण्यासाठी बासरी वाजवायचे. यानंतर मोदींनीही विद्यार्थ्यांसोबत बासरीवादनही केले.
मोदींच्या या शाळा भेटीदरम्यान शाळेच्या दैनंदिन कामकाजात कोणताही खंड पडला नाही. अन्य वर्ग नियमाप्रमाणेच सुरु होते. मोदींच्या आगमनानिमित्त शाळेत सुरक्षा व्यवस्था असली तरी त्याचा फटका शिक्षक आणि विद्यार्थ्यांना बसला नाही हेदेखील विशेष.