यामानाशी (जपान) : भारत व जपान यांच्यातील १३ व्या शिखर बैठकीसाठी रविवारी रात्री तोक्यो येथे रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांचा पाहुणचार घेऊन उभयतांमधील व्यक्तिगत मैत्री अधिक घट्ट केली. गेल्या चार वर्षांतील मोदी व अबे यांची ही १२ वी भेट आहे.यामानाशी हे निसर्गरम्य ठिकाण माऊंट फुजी या जपानमधील सर्वात उंच ज्वालामुखी पर्वताच्या पायथ्याशी वसलेले आहे. शनिवारी सायंकाळी मोदी दिल्लीहून थेट येथे आले. रविवारी दुपारी एका टुमदार रिसॉर्टमध्ये अबे यांनी मोदींसाठी मेजवानी आयोजित केली. रात्रीच्या जेवणासाठी मोदी यांना आपल्या ‘हॉली डे होम’मध्ये नेऊन जपानच्या पंतप्रधानांनी जातीने पाहुणचार केला. यावेळी अबे यांनी जपानी पद्धतीच्या चॉपस्टिक्सनी कसे जेवावे हे आपल्याला शिकविले, असे मोदी यांनी नंतर टिष्ट्वट केले.उभय नेत्यांनी विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला. ‘कणखर नेते असलेले मोदी हे माझे एक विश्वासू मित्र आहेत,’, अशी स्तुतीसुमने अबे यांनी उधळली. तसेच मोदींनी हाती घेतलेल्या भारताच्या विकासात आणि त्यांच्या ‘मेक इन इंडिया’ अभियानात जपान भरीव योगदान देत राहील, अशी त्यांनी ग्वाही दिली. गुजरातच्या पारंपरिक तरबेज कारागिरांकडून खास तयार करून घेतलेले दगडात कोरलेले ‘बाऊल’ आणि उत्तर प्रदेशच्या हस्तकलेचा सुंदर नमुना असलेल्या दुलया मोदींनी व्यक्तिगत भेट म्हणून अबे यांना दिल्या.सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस तोक्योमध्ये मोदी-अबे यांची शिखर बैठक व्हायची आहे. (वृत्तसंस्था)
मोदींनी घेतला अबे यांचा पाहुणचार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 5:22 AM