टोकियो : जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिंजो अनेक महिन्यांपासून आजारी आहेत. त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. त्यामुळेच अबे यांनी पंतप्रधान पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. शिंजो अबे यांना गेल्या आठवड्याभरात दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अबे यांनी राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत लवकरच बरे होण्याची प्रार्थना केली होती.
जपानमधील सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षानं दिलेल्या माहितीनुसार अबे यांची प्रकृती ठीक आहे. मात्र अबे यांना वारंवार उपचारांसाठी रुग्णालयात जावं लागत असल्याचा परिणाम देशातील परिस्थितीवर होत आहे. गेल्या आठवड्यात अबे यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. त्यांच्यावर सात तास उपचार झाले. अबे यांचा कार्यकाळ सप्टेंबर २०२१ पर्यंत होता. मात्र, त्यांनी त्याआधीच पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. अबे यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या प्रकृतीबद्दल काळजी व्यक्त केली होती. माझ्या प्रिय मित्राच्या प्रकृतीबद्दल समजल्यानंतर मला अतिशय वेदना झाल्या. नुकतेच, यावर्षी झालेल्या करारात आणि बांधिलकीत भारत व जपान या दोन्ही देशांचे मैत्रीपूर्ण संबंध दृढ झाले आहेत. मी आपल्या लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना करत असल्याचे मोदींनी म्हटले होते.
दरम्यान, अबे ८ वर्षांपासून पंतप्रधानपदी होते. सर्वाधिक काळ जपानचं नेतृत्त्व करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर जमा आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती नीट हाताळता न आल्यानं जपानमध्ये अबे यांच्याबद्दल नाराजी निर्माण झाली होती. त्यांच्या लोकप्रियतेत ३० टक्क्यांनी घट झाली. त्यांच्या पक्षावर घोटाळ्यांचे आरोप झाले आहेत. ६५ वर्षांच्या अबे यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्याचं आश्वासन दिलं होतं. चीनपासून असलेला धोका लक्षात घेता अबे यांच्याकडून सैन्याला सुसज्ज ठेवण्याचे प्रयत्न सातत्यानं सुरू होते.