रामल्ला - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक पॅलेस्टाइन दौ-याला सुरुवात झाली आहे. शनिवारी दुपारी जॉर्डनमार्गे मोदी पॅलेस्टाइनच्या रामल्ला शहरामध्ये दाखल झाले. मोदी यांचा हा पॅलेस्टाइन दौरा अत्यंत लहान म्हणजे फक्त तीन तासांचा आहे. पण अनेक अंगांनी हा दौरा ऐतिहासिक असेल. पॅलेस्टाइनला भेट देणारे मोदी भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. मागच्या वर्षी जुलै महिन्यात मोदी इस्त्रायल दौ-यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी पॅलेस्टाइनला भेट द्यायचे टाळले होते. त्यावरुन मोदी सरकारच्या हेतूबद्दलही अनेकांनी शंका व्यक्त केली होती. पण आता पॅलेस्टाइनचा दौरा करुन भारतासाठी दोन्ही देश सारखेच असल्याचा संदेश मोदींनी दिला आहे. रामल्ला पॅलेस्टाइनची राजधानी आहे. मोदींनी रामल्लामध्ये दाखल झाल्यानंतर माजी राष्ट्राध्यक्ष यासर अराफत यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन श्रद्धांजली वाहिली. त्यांनी यासर अराफत संग्रहालयालाही भेट दिली.
- हा ऐतिहासिक दौरा असून दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील असे टि्वट पंतप्रधान मोदींनी केले आहे.
- पंतप्रधान मोदी तीन तासाच्या आपल्या दौ-यात राष्ट्रपती महमूद अब्बास यांच्याशी चर्चा करणार आहे. यावेळी दोन्ही देशांमध्ये महत्वाचे करार होतील.
- पॅलेस्टाइनच्या रामल्ला शहरात सुपर स्पेशलिटी रुग्णालय बांधून देण्याची घोषणा मोदी करु शकतात. पॅलेस्टाइन जनता आतापर्यंत ज्या पायाभूत सोयी-सुविधांपासून वंचित आहे त्या उपलब्ध करुन देण्यावर मोदींचा भर असेल.
- पॅलेस्टाइनला मान्यता देणारा भारत पहिला बिगरअरब देश असून त्यांच्याबरोबर कुटनितीक संबंधही प्रस्थापित केले.
- शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी जॉर्डनची राजधानी अम्मानमध्ये दाखल झाले. किंग अब्दुल्ला दुसरे यांची भेट घेतल्यानंतर ते आज दुपारी हॅलिकॉप्टरने रामल्लामध्ये पोहोचले.
- किंग अब्दुल्ला दुसरे यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा झाली. भारत-जॉर्डनमधील संबंध अधिक दृढ होतील असे मोदींनी म्हटले आहे.
- यूएईमध्ये पंतप्रधान मोदी त्या देशाचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम यांची भेट घेतील. दुबईमध्ये होणा-या वर्ल्ड गर्व्हमेंट समिटमध्येही मोदींचे भाषण होणार आहे.
- पंतप्रधान म्हणून मोदी पहिल्यांदाच ओमानला भेट देणार आहेत. ओमानचे सुल्तान आणि अन्य प्रमुख नेत्यांची ते भेट घेतील.