ऑनलाइन लोकमतबीजिंग, दि. 14 - काळ्या पैशाला प्रतिबंध घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेला नोटबंदीचा निर्णय आश्चर्यकारक आणि धाडसी असल्याचं मत चिनी मीडियानं मांडलं आहे. मोदींची लढाई भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरोधात असल्याची प्रतिक्रियाही चिनी माध्यमांनी दिली. मात्र मोदींच्या या निर्णयामुळे भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन होईल की नाही याबाबत साशंकता आहे. तसेच नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी चीनचे पंतप्रधान शी जिनपिंग यांच्याकडून नव्या युक्त्या घ्याव्यात, असा सल्लाही ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्रातून देण्यात आला आहे. ग्लोबल टाइम्सच्या वृत्तानुसार, भारताचा 500 आणि 1000च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय म्हणजे मोदींनी उचललेले धाडसी पाऊल आहे. तसेच भारतात जास्तीत जास्त व्यवहार हे रोखीनं चालत असून, 500 आणि 1000च्या नोटांचं प्रमाणही 80 टक्के आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून काळा पैसा, भ्रष्टाचार आणि करचुकवेगिरी करणा-यांना वचक बसला आहे. मोदी सरकारचा नोटबंदीचा निर्णय साहसी असला तरी भ्रष्टाचाराचा खात्मा करण्यासाठी एवढंच पुरेसं नाही. यंत्रणेतही सुधारणा करण्याची गरज असून, मोदींनी चीनकडून नव्या कल्पना घ्याव्यात जेणेकरून भ्रष्टाचाराला प्रतिबंध घालता येईल. चीनच्या पंतप्रधानांनी कडक धोरणं अवलंबून चुकीचे काम करणा-या अधिका-यांना एक लाखांपर्यंत दंड आकारला आहे. त्यामुळे मोदींनी जिनपिंग यांच्याकडून सल्ला घेतल्यास त्यांना फायदाच होईल, असंही ग्लोबल टाइम्सनं म्हटलं आहे.
मोदींचा नोटबंदीचा निर्णय धाडसी, चिनी मीडियाची प्रतिक्रिया
By admin | Published: November 14, 2016 8:16 PM