लंडन : पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटनच्या पहिल्या दौऱ्यावर गुरुवारी येथे पोहोचले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्यासह ब्रिटिश नेतृत्वातील वरिष्ठ नेत्यांशी ते चर्चा करतील. आर्थिक संबंध बळकट करण्याच्या दृष्टीने त्यांनी तीन दिवसांचे भरगच्च कार्यक्रम निर्धारित केले आहेत. दरम्यान भारतातील असहिष्णुतेच्या वातावरणाकडे लक्ष वेधत ब्रिटनमधील ‘आवाज नेटवर्क’ने निषेध दिन पाळण्याची घोषणा केली आहे. या गटाने बेबमिनिस्टिर पॅलेस येथे स्वस्तिक चिन्हावर ‘मोदी नॉट वेलकम’ असा लावलेला फलक चर्चेचा विषय ठरला आहे.१० डाऊनिंग स्ट्रीट येथे कॅमेरून यांच्यासोबत चर्चेने ते या दौऱ्याचा प्रारंभ करीत आहेत. ‘‘लंडनला पोहोचलो आहे. भारत- ब्रिटनचे संबंध दृढ करण्यासाठी त्यामुळे मदत होईत. या देशातील व्यापक विषयांवरील कार्यक्रमांचा मी एक भाग असणार आहे’’, असे टिष्ट्वट मोदींनी लंडनला पोहोचताच केले. ‘‘मोदी ब्रिटनमध्ये. ब्रिटनमधील भारतीय समुदायातर्फे आपले स्वागत’’ असे टिष्ट्वट करीत कॅमेरून यांनी त्यांना प्रतिसाद दिला. मोदी हिथ्रो विमानतळावर पोहोचताच भारतीय वंशाच्या ब्रिटिश खासदार प्रीती पटेल, विदेश आणि राष्ट्रकुल व्यवहार राज्यमंत्री ह्युगो स्वायर तसेच भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त जेम्स बेव्हन यांनी त्यांचे स्वागत केले.ब्रिटनमधील २०० वर लेखकांचेकॅमेरून यांना पत्रब्रिटनमध्येही भारतातील असहिष्णू वातावरणाविरुद्ध आवाज उठविला जात असून सलमान रश्दी, नील मुखर्जी, इयान मॅकइवान, हरी कुंझरू यांच्यासारख्या नामवंतांसह २०० पेक्षा जास्त लेखकांनी कॅमेरून यांना खुले पत्र पाठवून भारतातील भयाच्या वातावरणाकडे लक्ष वेधले आहे.भारतातील मूलतत्त्ववादाला विरोध करणाऱ्यांचा आवाज दडपण्यासाठी असहिष्णुता आणि हिंसाचाराच्या घटना वाढत असून भयाचे वातावरण निर्माण केले जात आहे, असे या लेखकांनी स्वाक्षरीनिशी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. जगभरातील मान्यवर लेखकांचा समावेश असलेल्या ‘पेन इंटरनॅशनल’ या संस्थेने भारतातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जात असल्याची चिंता व्यक्त करीत हे पत्र प्रकाशित केले आहे.या संस्थेच्या इंग्लंड, वेल्स आणि स्कॉटलंड येथील केंद्रातील सदस्यांनीही या पत्रावर स्वाक्षरी केली आहे. एम.एम. कलबुर्गी, गोविंद पानसरे आणि नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येकडे लक्ष वेधत भारतातील ४० लेखकांनी साहित्य पुरस्कार परत केल्याचा उल्लेखही या पत्रात आहे. (वृत्तसंस्था)शिखांच्या काही गटांनी स्वतंत्र खलिस्तानची मागणी पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न चालविल्याबद्दल पंतप्रधान मोदी कठोर कारवाई करण्याची मागणी लावून धरतील असे संकेत मिळाले आहेत. शीख युवकांना बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण देण्यासह त्यांच्यात कट्टरतावाद बाणवला जात आहे. ब्रिटनमधील कट्टरवादी शीख संघटनांच्या कारवायांचा संपूर्ण तपशील असलेला अहवाल (डोझियर)कॅमेरून यांना चर्चेच्यावेळी सादर केला जाईल. या गटाने युरोपीय देशांत विशेषत: ब्रिटनमध्ये भारतविरोधी कारवायांना वेग दिला आहे. शिरोमणी अकाली दलाच्या (मान) युवा शाखेचा उपाध्यक्ष अवतारसिंग खंदा हा खलिस्तानवादी अतिरेकी जगतारसिंग आणि परमजितसिंग पम्मा यांचा निकटस्थ मानला जातो. त्याने शीख युवकांना अतिरेकी कारवायांकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न चालविल्याबद्दल भारताने वेळोवेळी चिंता व्यक्त केली आहे.
ब्रिटनमध्ये मोदींचे स्वागत आर्थिक संबंधांचे नवे पर्व
By admin | Published: November 13, 2015 12:06 AM