ऑनलाइन लोकमत
जेरुसलेम, दि. 5 - यहा कोई परिंदा भी पर नही मार सकता हा हिंदी चित्रपटातला डायलॉग पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रायलमध्ये जिथे मुक्कामाला आहेत त्या ठिकाणाला तंतोतंत लागू पडतो. एरवी पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत अत्यंत काटेकोरपणे खबरदारी घेतली जाते. सुरक्षेच्या आघाडीवर छोटीशी चूक राहणार नाही याची एसपीजीकडून काळजी घेतली जाते. पण आता इस्त्रायलमध्ये मोदींच्या सुरक्षेची फारशी काळजी करण्याचे कारण नाही.
मोदी किंग डेव्हीड हॉटेलच्या ज्या सूटमध्ये मुक्कामाला आहेत ते पृथ्वीवरचे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. संपूर्ण हॉटेलमध्ये बॉम्ब हल्ला किंवा केमिकल हल्ला झाला तरी, मोदींच्या सूटला किंचितही धक्का लागणार नाही. किंग डेव्हीड हॉटेलच्या सुरक्षेची जबाबदारी संभाळणा-या शेलडॉन रिटझ यांनी टाइम्स ऑफ इंडियाला ही माहिती दिली. मोदींच्या इस्त्रायल दौ-याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.
इस्त्रायलमध्ये अमेरिकन अध्यक्षांच्या दौ-यासाठी जी व्यवस्था केली जाते तशीच व्यवस्था मोदींसाठी करण्यात आली आहे. या शतकातील क्लिंटन, बुश, ओबामा आणि ट्रम्प या अमेरिकन अध्यक्षांचे आम्ही आदिरातिथ्य केले आहे असे रिटझ यांनी सांगितले. मोदींच्या खाद्य-पदार्थांच्या सवयी लक्षात घेऊऩ त्यांच्यासाठी खास शाकाहारी आचा-यांची व्यवस्था करण्यात आली आहे. हॉटेलमधल्या रुममध्ये भारतीय शिष्टमंडळाच्या आवडीनुसार फुलांची सजावट करण्यात आली आहे.
आणखी वाचा
तीन दिवसांच्या इस्त्रायल दौ-यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी संध्याकाळी इस्रायलमध्ये दाखल झाले आहेत. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता मोदी बेन गुरियन विमानतळावर पोहोचले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी प्रोटोकॉल तोडून विमातळावर मोदींचं स्वागत केलं. नेत्यानाहू यांनी मोदींचं स्वागत करताना हात जोडून त्यांना नमस्ते केलं तर आपका स्वागत है मेरे दोस्त असं हिंदीत ते म्हणाले.
इस्रायलला भारतीय संस्कृती , इतिहास , लोकशाही याविषयी प्रेम आहे आणि हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. भारत आणि इस्रायली लोकांची गुणवत्ता हा दोन्ही देशांमधील समान धागा असून त्यामुळे आमची भागीदारी यशस्वी ठरेल, असा विश्वास नेत्यानाहू यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला.