ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऐतिहासिक इस्त्रायल दौ-यामुळे दोन्ही देशांमध्ये उत्साहाचं वातावरण असताना नेहमीच भारताच्या विरोधात भूमिका घेणारा पाकिस्तान मात्र संशयाने पाहत आहे. मोदींच्या इस्त्रायल दौ-यामागे पाकिस्तानच्या लष्करी सामर्थ्याला आव्हान देण्याचा कट असल्याचा दावा पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमं करत आहेत. महत्वाचं म्हणजे अनेक प्रसारमाध्यमांना आपलं लक्ष फक्त दौ-यावर केंद्रीत केलं असताना, अनेक इंग्लिश आणि उर्दू वृत्तपत्रांनी फक्त जुजबी माहिती देण्याचं काम केलं आहे.
आणखी वाचा -
डॉन वृत्तपत्राने वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीचा आधार घेत मोदींच्या दौ-याची बातमी दिली. "इस्त्रायलला जाणारे पहिले भारतीय पंतप्रधान", अशी हेडलाईन त्यांनी दिली होती. तर "द एक्स्प्रेस ट्रिब्यून"ने दिलेल्या बातमीत "इस्त्रायलमध्ये राहणा-या भारतीय ज्यूंसाठी मोदींच्या दौ-याचं विशेष महत्व" असा उल्लेख करण्यात आला आहे.
चॅनेल 42 ने तर मोदींचा इस्त्राईल दौरा म्हणजे इस्लामाबादविरोधात कारवाई करण्यासाठी दोन्ही देशांनी केलेली हातमिळवणी असल्याचं म्हटलं आहे. नवी दिल्ली आणि तेल अवीवमधील संबंधांचा यावेळी उल्लेख करण्यात आला आहे. "भारत आणि इस्त्रायलची वाढती जवळीक काही नवी नसून, याआधीही पाहायला मिळाली आहे, पाकिस्तानविरोधात कारवाई करण्यासाठी इस्त्रायलने वारंवार भारताला मदत केली आहे", असाही दावा चॅनेलने केला आहे.
सुरक्षा विश्लेषक अली यांनी तर हिंदू आणि इस्त्रायलमध्ये जास्त काही फरक नसल्याचं सांगितलं आहे. "भारत आणि इस्त्रायलमध्ये देशहितासंबंधी झालेल्या बैठकीचा अर्थ पाकिस्तानने दोन्ही देशांच्या सुरक्षेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण याचा थेट परिणाम पाकिस्तानच्या सुरक्षेवर पडणार आहे, जे आपल्या हिताचं नाही", असं अली बोलले आहेत. यावेळी अली यांनी पाकिस्तानला आपल्या देशहिताकडे लक्ष देत त्याप्रमाणे पाऊलं उचलणं गरजे असल्याचंही सांगितलं आहे.
"आज जेव्हा सौदी अरेबिया इस्त्रायलशी संबंध जोडण्याचा विचार करत आहे, तिथे पाकिस्तानने आपल्या देशहितासाठी काय करायला हवं याचा विचार करणं गरजेचं आहे. भारताच्या आक्रमक परराष्ट्र धोरणांवर करडी नजर ठेवली पाहिजे", असंही अली बोलले आहेत.
एकीकडे मोदींच्या दौ-यामुळे अनेकजण चिंता व्यक्त करत असताना काहीजणांनी पाकिस्तानला घऱचा आहेर देत आपल्या परराष्ट्र धोरणांवर विचार करण्याचा सल्ला दिला आहे.
परवेज मुशर्रफ सत्तेत असताना 2005 रोजी पाकिस्तानने इस्त्रायलशी संपर्क साधला होता. त्यावेळी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री खुर्शीद कसुरी आणि इस्त्रायलचे सिल्वन शॅलोम यांच्यात इस्तंबूल येथे बैठकही झाली होती. त्यावेळी सिल्वन शॅलोम यांनी या भेटीचा ऐतिहासिक भेट म्हणून उल्लेख केला होता. मात्र यानंतर कोणतीही प्रगती झाली नाही, आणि दोन्ही देशांचा संपर्क तुटला.