वॉशिंग्टन : पॅरिस शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होणार आहे. पुढील आठवड्यात होत असलेल्या या परिषदेत मोदी व ओबामांसह अनेक जागतिक नेते सहभागी होणार आहेत. हवामान बदलावर जागतिक करार घडवून आणण्याबाबत अमेरिकेला इतर देशांशी ताळमेळ घालता यावा यासाठीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ते मोदींची भेट घेणार आहेत.पॅरिस हवामान बदल संमेलनात महत्त्वाकांक्षी व समाधानकारक करार घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असलेले ओबामा ३० नोव्हेंबर रोजी मोदींना भेटतील. ही परिषद सुरू होण्यापूर्वीच ओबामा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत. हवामान बदलावर एक ठोस जागतिक करार घडवून आणण्यासाठी ओबामा जगभरातील नेत्यांच्या भेटी घेणार असल्याचे व्हाईट हाऊसने घोषित केले. ओबामा आणि मोदींतील २०१४ नंतरची ही सातवी भेट असेल. अमेरिकेचे उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बेन ऱ्होड्स म्हणाले की, पॅरिस शिखर परिषदेची सकारात्मक फलनिष्पत्ती घडवून आणण्यासाठी आम्ही काय योगदान देऊ शकतो याबाबत आम्ही वर्षभर भारताशी चर्चा करत होतो. (वृत्तसंस्था)
पॅरिस परिषदेदरम्यान मोदी-ओबामांची भेट
By admin | Published: November 25, 2015 11:56 PM