ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. ९ - काश्मिरचा प्रश्न पाकिस्तान संयुक्त राष्ट्रांमध्ये उठवत असताना त्यांच्याच देशातल्या मोहाजीरांनी (फाळणीच्यावेळी पाकिस्तानात गेलेले भारतीय मुस्लीम) पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी करत आझादीची मागणी केली आणि पाकिस्तानला घरचा अहेर दिला.
सोशल मीडियावर आता या आंदोलनांचे व्हिडीयो व्हायरल होत असून त्यामुळे पाकिस्तानमध्ये अस्वस्थता पसरली आहे. भारतापासून वेगळे होत पाकिस्तानच्या निर्मितीमध्ये ज्यांचा मोलाचा सहभाग होता, त्या मोहाजीरांनीच आता बंडाचं निशाण उभारल्यामुळे आणि स्वतंत्र भूभागासह आझादीची मागणी केल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीबाहेर मोहाजीरांनी केलेल्या निदर्शनाचे व्हिडीयो बघून हा प्रकार धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया मारवी मेमन या पाकिस्तानच्या खासदाराने व्यक्त केल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
१९४७ साली आपण स्वतंत्र झालो, त्यांच्या काही समस्या असतिल तर त्यांनी पाकिस्तान सरकारशी बोलणी करायला हवीत असे मत मेमन यांनी व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे शेकडो मोहाजीरांनी आझादी आझादी अशा घोषणा देत केलेल्या निदर्शनांची दखल प्रसारमाध्यमांनी घेतलेली नाही.
संयुक्त राष्ट्रांमध्ये स्वतंत्र काश्मिरचा मुद्दा वारंवार काढणा-या पाकिस्तानला मोहाजीरांनी हा घरचाच आहेर दिला आहे.
मोहाजीर कौमी मूव्हमेंट या चळवळीच्या अमेरिकेतील शाखेने ही निदर्शने केली आहेत. पाकिस्तानमध्ये जवळपास पाच कोटी इतकी प्रचंड संख्या मोहाजीरांची असून ते दहशतीखाली असल्याचा मोहाजीरांचा दावा आहे.
मोहाजीर हे भारतीय असून ते रॉचे एजंट असल्याचा ठपका पाकिस्तान सरकार ठेवतं असाही एक आरोप आहे. मोहाजीरांना न्याय मिळवून देण्यास न्याययंत्रणा अपयशी ठरल्याचा ठपकाही ठेवण्यात येत आहे.
कराची हा मोहाजीर कौमी मूव्हमेंटचा बालेकिल्ला असून गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांच्यावर पाकिस्तानी सैन्याने जोरदार कारवाई केली आहे, परिणामी त्यांनी विरोधाची धार तीव्र केली आहे.
याखेरीज बलुचिस्तानची देखील स्वतंत्र होण्याची मागणी उफाळून आली आहे. स्वायत्ततेसाठी त्यांनी देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.