लंडन - मोनार्क एअरलाइन्स ही ब्रिटनमधली विमानकंपनी बंद पडली असून लाखो प्रवासी विदेशामध्ये ठिकठिकामी अडकले आहेत. त्यांना ब्रिटनमध्ये कसं आणायचं हा यक्षप्रश्न ब्रिटनच्या अधिकाऱ्यांसमोर असून त्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार मोनार्क एअरलाइन्सची येत्या काळातली जवळपास 3 लाख बुकिंग रद्द करण्यात आली आहेत.
इंग्लंडच्या सरकारने नागरी उड्डाण खात्याला 30 विमानांची सोय करण्यास सांगितले असून, विदेशामध्ये जिथे जिथे ब्रिटनचे नागरिक अडकले असतील त्यांना आणण्यास सांगितले आहे. अशा प्रवाशांची संख्या 1,10,000 आहे. जीवघेण्या स्पर्धेमुळे युरोपातील विमानकंपन्यांवर प्रचंड दडपण असून कंपन्या बंद होणे किंवा एकत्र येणे यासारखे प्रकार अपेक्षित आहेत. एअर बर्लिन व अलितालिया या कंपन्यांनी दिवाळखोरी जाहीर केली आणि उद्योगासाठी गुंतवणूकदारांचा शोध सुरू केला.
अत्यंत स्पर्धात्मक वातावरण आणि वाढते खर्च यांचा ताळमेळ बसवणं अनेकांना जड जात आहे. या वातावरणामुळेच मोनार्क एअरलाइन्स बराच काळ तोटा सहन करत होती. मोनार्क बंद पडल्यामुळे विमानं भाड्यानं देणाऱ्या किंवा कर्ज पुरवणाऱ्या कंपन्यांची डोकेदुखीही वाढणार आहे. मोनार्कच्या सध्याच्या ताफ्यात 36 एअरबस जेट आहेत तर बोइंगनं 32 विमानं नुकतीच मोनार्कला विकली आहेत. परंतु ही विमानं अद्याप हस्तांतरीत झालेली नाही.
एअरबस व बंबार्डिअरच्या स्पर्धेत उतरत बोइंगनं मोनार्कशी विमान विक्रीचा करार करण्यात यश मिळवलं होतं. आता, मोनार्कच बंद पडल्यामुळे अनेक संबंधित कंपन्यांना झळ बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, मोनार्क बंद पडल्यामुळे होणारा विपरीत परिणाम कमीत कमी कसा ठेवता येईल याता प्रयत्न करण्यात आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
मोनार्क एअरलाइन्सची माहिती... काही आकड्यांमध्ये
1967 - या वर्षी मांटेगाझा बंधुंनी ल्युटव एअरपोर्टवर ही कंपनी सुरू केली, त्यावेळी ताफ्यात दोन विमानं होती.3000 - आजच्या घडीला असलेली कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या34 - सध्या कंपनीच्या ताफ्यात असलेल्या विमानांची संख्या57 लाख - 2015 या वर्षी कंपनीने वाहतूक केलेल्या प्रवाशांची संख्या. 2014 मध्ये 70 लाख प्रवासी वाहतुकीच्या तुलनेत घसरलेली प्रवासी संख्या125 दशलक्ष पौंड - ग्रेबुल कॅपिटलला 2014 मध्ये 90 टक्के भागभांडवल या किमतीला विकलं आणि मांटेगाझा यांचा सहभाग संपुष्टात आला.30 टक्के - 2014 मध्ये पुनर्रचना करण्याचे ठरल्यावर कर्मचाऱ्यांनी स्वीकारलेली पगारातली कपात.40 दशलक्ष पौंड - या वर्षी अपेक्षित असलेला नफा. 2014 मध्ये कंपनीने 94 दशलक्ष पौंडांचा तोटा सोसला होता.165 दशलक्ष पौंड - ऑक्टोबर 2016 मध्ये ग्रेबुलने केलेली वाढीव गुंतवणूक.