वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (आयएमएफ) पाकिस्तानला मिळालेले अर्थसाह्य चिनी कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरले जाऊ नये, यासाठी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रशासन आटोकाट प्रयत्न करीत आहे. अमेरिकी खासदारांना ट्रम्प प्रशासनाच्या वतीने ही माहिती देण्यात आली.सूत्रांनी सांगितले की, पाकिस्तान सध्या कर्ज परतफेडीच्या समस्येने ग्रस्त आहे. यामुळेच पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला येण्याचा धोका निर्माण झाला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी पाकिस्तानही अनेक पातळीवर प्रयत्न करीत आहे. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे ८ अब्ज डॉलरचे अर्थसाह्य मागितले आहे. नाणेनिधी आणि पाकिस्तान यांच्यात अलीकडे झालेल्या एका बैठकीत यावर तडजोडही झाल्याचे समजते. चीनकडून घेतलेले भरमसाट कर्ज पाकिस्तानी अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानांना जबाबदार आहे, असे अमेरिकेला वाटते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा है पैसा चिनी कर्ज फेडण्यासाठी पाककडून वापरला जाऊ शकतो, अशी भीती अमेरिकी खासदारांना वाटते. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे वित्त उपमंत्री डेव्हिड मालपास यांनी काँग्रेस सभागृहातील एका सुनावणीत सांगितले की, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला अर्थसाह्य दिले जात असेलच, तर हा पैसा चीनचे कर्ज फेडण्यासाठी वापरला जाऊ नये, अशी स्पष्ट भूमिका आम्ही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे अनेकदा मांडली आहे. भविष्यकाळात अशी असफलता येऊ नये, यासाठी पाकिस्तानने आपला आर्थिक कार्यक्रम बदलावा, असे अमेरिकेला वाटते. त्यासाठी प्रशासन प्रयत्नही करीत आहे.नागरिकांच्या करांतून आलेला पैसा‘आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांच्या प्रभावीपणाचे मूल्यांकन’ या मुद्यावर काँग्रेस सभागृहाच्या वित्तीय सेवा समितीच्या सुनवाणीदरम्यान काँग्रेस सदस्य एड रॉयस यांनी सांगितले की, पाकिस्तान नाणेनिधीकडून अब्जावधी डॉलरचे संकटमुक्ती पॅकेज मागत आहे. नाणेनिधीकडे असलेल्या पैशात अमेरिकी नागरिकांच्या करांच्या पैशांचाही समावेश आहे. हा पैसा चिनी बाँडमध्ये अथवा थेट चीनकडे हस्तांतरित होऊ नये, अशी भूमिका अमेरिकी विदेशमंत्री माईक पॉम्पेव यांनीही जुलैमध्ये घेतली होती.
चीनचे कर्ज फेडण्यासाठी नाणेनिधीचा पैसा पाकला वापरता येणार नाही; अमेरिकेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 2:06 AM