नवी दिल्ली : कोरोना साथीनंतर आता जगभरात मंकीपॉक्सने भीती वाढविली आहे. आतापर्यंत १९ देशांत मंकीपॉक्सचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील १३१ रुग्णांना मंकीपॉक्स असल्याचे स्पष्ट झाले आहे, तर १०६ संशयित रुग्ण आहेत.
स्पेन आणि बेल्जियममध्ये हा रोग लैंगिक संबंधातून पसरला असल्याचे सांगण्यात येत आहे. ब्लूमबर्ग ओपिनियनचे बॉबी घोष यांनी सोशल मीडियावरील एका लाइव्ह कार्यक्रमात सांगितले की, हा चिकनपॉक्ससारखा एक आजार आहे. अमेरिकेत २००३ मध्ये याचे ७१ रुग्ण आढळले होते. घानाहून आयात केलेल्या उंदरामुळे हे घडल्याचे सांगितले जाते. याला मंकीपॉक्स संबोधले जात असले तरी, हा माकडापासून होत नाही. हा विविध प्रजातींना संक्रमित करू शकतो.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थचे रिकार्डो जॉर्ज यांनी सांगितले की, पोर्तुगालमध्ये पसरलेला मंकीपॉक्स हा पश्चिम आफ्रिकेतील विषाणूपेक्षा कमी आक्रमक आहे. ही साथ आणखी पसरण्याची शक्यता असली तरी, यात दिलासा देणारी बाब अशी आहे की, हा संसर्ग आणखी गंभीर बनलेला नाही. यूएईत मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. याची सुरुवात डोकेदुखी आणि तापेतून होते. अंगदुखी, सूज आणि पाठीत वेदना होतात. ताप आल्यानंतर साधारण तीन दिवसांनी अंगावर फोड, पुरळ येतात. याची सुरुवात चेहऱ्यापासून होते आणि शरीराच्या अन्य भागावर हे पुरळ येतात. हा संसर्ग साधारणपणे चार आठवड्यांपर्यंत राहतो.
या देशात झाला संसर्ग... ऑस्ट्रिया, स्लोव्हिनिया, झेक प्रजासत्ताक, यूएई, ब्रिटन, फ्रान्स, स्वीडन, इटली, स्पेन, पोर्तुगाल, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, बेल्जियम, नेदरलँड, इस्रायल आणि स्वित्झर्लंड, उत्तर अमेरिका.
कसा पसरतो मंकीपॉक्स... एखादी व्यक्ती अन्य व्यक्तीच्या, जनावरांच्या अथवा विषाणूच्या संपर्कात आल्याने हा आजार पसरतो. हा विषाणू त्वचा, डोळे, नाक, तोंडाच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करतो. उपचार म्हणून रुग्णाला विलगीकरणात ठेवले जाते.