लंडन - संपूर्ण जग सध्या कोरोना विषाणूशी लढत असतानाच आता ब्रिटनमध्ये अजून एका विषाणूचे रुग्ण सापडले आहेत. या विषाणूचे नाव आहे मंकीपॉक्स. ब्रिटनमधील नॉर्थ वेल्समध्ये एकाच कुटुंबीतील दोन व्यक्तींना मंकीपॉक्स झाल्याच्या वृत्तास दुजोरा मिळाला आहे. आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते सर्वसामान्यांन्या या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता कमी आहे. तसेच हा विषाणू परदेशातून ब्रिटनमध्ये आल्याचा दावाही या आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे.
ब्रिटिश वृत्तसंकेतस्थल द वीकमधील वृत्तानुसार पब्लिक हेल्थ वेल्सच्या म्हणण्यानुसार, दोन्ही रुग्ण हे युनायटेड किंग्डमच्या बाहेर बाधित झाले असावेत. मात्र या रुग्णांचे निदान झाल्यानंतर कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम सुरू झाले आहे.
तर डब्ल्यूएचओने दिलेल्या माहितीनुसार मंकीपॉक्स हा जनावरांमधून माणसांमध्ये पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. हा आजार प्रामुख्याने मध्य आणि पश्चिम आफ्रिकेमधील देशांमध्ये पसरतो. तसेच तेथून तो जगातील इतर देशांमध्ये पसरतो. संसर्ग झालेल्या जनावराच्या संपर्कात आल्यामुळे हा आजार पसरतो. या आजारामध्ये स्मॉलपॉक्स म्हणजेच देवीसारखी लक्षणे दिसून येतात. या आजारात ताप, डोकेदुखी, कंबरदुखी, स्नायू आखडणे आणि अशक्तपणा अशी लक्षणे दिसून येतात.
युनायटेड किंग्डमच्या नॅशनल हेल्छ सर्व्हिसने दिलेल्या माहितीनुसार पहिला दिवसापासून पाचव्या दिवसापर्यंत शरीरावर पुरळ येतात. सुरुवातीला ते चट्ट्याप्रमाणे येतात. त्यानंतर हळूहळू संपूर्ण शरीरावर पसरतात. आजारादरम्यान, रॅशेस तांबड्या रंगाचे होतात. अखेर या चट्ट्यांचे पापुदे बनून शरीरावरून घळून पडतात.
डब्ल्यूएचओच्या माहितीनुसार या आजारामधील मृत्यूदर हा तब्बल ११ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. मात्र दिलासादायक बाब म्हणजे देवीपासून वाचवणारी लस ही मंकीपॉक्सवरही परिणामकारक आहे. अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार देवीविरोधात तयार झालेली सिडोफोवीर, एसटी-२४६ आणि व्हॅक्सिनिया इम्युटी ग्लोबुलिन (व्हीआयजी) मंकीपॉक्सवरही प्रभावी आहे.
मंकीपॉक्स या आजाराचे प्रथम निदान १९७० मध्ये झाले होते. आफ्रिका खंडातील कांगो या देशात हा आजार सापडला होता. त्यानंतर २००३ मध्ये हा आजार अमेरिकेसह जगातील अनेक देशांमध्ये पसरला होता.