वॉशिंग्टन : चंद्र स्थिरपणे लहान होत असल्यामुळे त्याच्या पृष्ठभागावर सुरकुत्या पडत असून, तो कंप पावत आहे, असे ‘नासा’च्या लुनार रिकॉनिसन्स आॅर्बिटरने घेतलेल्या छायाचित्रांच्या विश्लेषणाचे म्हणणे आहे. चंद्राचा आतील भाग थंड होत असल्यामुळे चंद्र आकसत चालला आहे. चंद्र गेल्या कित्येक शेकडो दशलक्ष वर्षांत ५० मीटर्सच्याही वर पातळ झाला आहे व त्याच्या परिणामी चंद्राच्या पृष्ठभागावर कंप निर्माण होत आहेत, असे अभ्यासात आढळले.
द्राक्ष वाळल्यावर मनुक्याचे रूप धारण करते तशा सुरकुत्या चंद्रावर पडत असल्याचे संशोधकांनी म्हटले. द्राक्षाचे आवरण लवचिक असते; परंतु चंद्राच्या पृष्ठभागाचा पापुद्रा ठिसूळ असल्यामुळे त्याच्यावर सुरकुत्या पडल्या की चंद्र आकसत चालला की त्या तुटतात. त्यातून पापुद्र्याचा एक विभाग शेजारच्या भागात घुसतो. याला ‘थ्रस्ट फॉल्टस्’ म्हणतात. यात जुन्या खडकांना तरुण खडकांच्या वर ढकलले जाते. आमच्या विश्लेषणाने पहिला पुरावा दिला आहे तो हा की, हे फॉल्टस् अजूनही सक्रिय असून, आज चंद्र हळूहळू थंड होऊन आकसत असल्यामुळे ते चंद्रकंप निर्माण करण्याची शक्यता आहे, असे अमेरिकेतील स्मिथसोनियन्स नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियमचे वरिष्ठ शास्त्रज्ञ थॉमस वॅटर्स यांनी म्हटले. यातील काही चंद्रकंप हे बऱ्यापैकी शक्तिशाली म्हणजे रिश्चर स्केलवर पाच तीव्रतेचे असतील, असे वॅटर्स निवेदनात म्हणाले. (वृत्तसंस्था)विश्लेषणात काय आढळले?हे फॉल्ट स्कार्प्स चंद्राच्या पृष्ठभागावरून पाहिल्यास छोट्या पायऱ्यांच्या आकाराच्या उंच कडांसारखे दिसतात. ते दहा-दहा मीटर्स उंच आणि कित्येक किलोमीटर्स लांब पसरलेले असतात.हा अभ्यास नेचर जिओसायन्स नियतकालिकात प्रकाशित झाला असून, चंद्रावर अपोलो अंतराळवीरांनी बसवलेल्या चार सिस्मोमीटर्सने जी माहिती पाठवली तिचे विश्लेषण अलगोरिदम किंवा मॅथेमॅटिकल प्रोग्रॅमने करण्यात आले. हे तंत्र भूकंपासंबंधीच्या विखुरलेल्या नेटवर्कने कंपाची ठिकाणे शोधल्यानंतर त्यांचे नेमके ठिकाण शोधण्यासाठी विकसित झाले आहे. अलगोरिदमने चंद्रकंपाच्या ठिकाणांचा चांगला अंदाज दिला आहे.