तुमच्या मणक्याचे हाड मोडल्यावर तुम्ही चालू शकत नाहीत. अशाचप्रकारे प्राण्यांच्या मणक्याचे हाड मोडल्यानंतर काही काळातच त्यांचा मृत्यू होतो. पण, एक महाकाय व्हेल मासा तुटलेला मणका घेऊन हजारो किलोमीटर प्रवास करत आहे. मून (Moon) नावाची हंपबॅक व्हेल (Humpback Whale) सध्या खूप वेदनेत आहे. या व्हेलचे मणक्याचे हाड मोडले असून, तशाच अवस्थेत हा मासा हजारो किलोमीटर प्रवास करत आहे. एक जहाजशी धडक बसल्यानंतर व्हेलचा मणका तुटला होता. या व्हेलवर उपचारही करता येत नाहीत, त्यामुळे शास्त्रज्ञ चिंतेत आहेत.
मूनने केला मोठा कारनामा...यातच मूनने एक असा कारनामा करुन दाखवला आहे, जो पाहून जगभरातील समुद्री प्राण्यांवर अभ्यास करणारे शास्त्रज्ञ चकीत झाले आहेत. मूनचा सप्टेंबर 2022 मध्ये अपघात झाला होता, तेव्हा ही व्हेल कोलंबियाजवळ आढळून आली होती. यानंतर 1 डिसेंबर 2022 रोजी हीच व्हेल हवाईमध्ये दिसून आली. म्हणजेच मूनने तुटलेल्या मणक्यासह 4828 किलोमीटरचा प्रवास केला आहे. विशेष म्हणजे, शास्त्रज्ञ गेल्या दहा वर्षांपासून मूनवर अभ्यास करत आहेत.
मून ब्रेस्टस्ट्रोक पद्धतीने पोहतेशास्त्रज्ञांनी सांगिल्यानुसार, मूनने कॅनडा ते हवाईपर्यंतचा प्रवास ब्रेस्टस्ट्रोक पद्धतीने केला. या पद्धतीत मून अतिशय हळुहळू पोहते. यादरम्यान वेदनेने व्हिवळण्याचा आवाजही ऐकू येतो. मूनवर अभ्यास करणाऱ्या एनजीओ बीसी व्हेल्सच्या प्रमुख जेनी रे यांनी सांगितले की, जिवंत राहण्यासाठी मूनला सलग पोहत राहावे लागेल. त्यांना मूनसाठी खूप वाईट वाटते, पण त्या काहीच करू शत नाही.
मारू शकत नाही, उपचारही करू शकत नाहीतअनेकांनी मूनला यूथेनाइज (Euthanize) म्हणजेच इच्छामृत्यू देण्याचा सल्ला दिला. पण, जेनी रे यांनी सांगितले की, मूनला मारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विषारी पदार्थ लागेल. मून मरेल, पण तिला खाणाऱ्या इतर माश्यांवरही या विषाचा वाईट परिणाम होईल. मून समुद्रकिनारी आली असती, तर तिच्यासाठी काहीतरी करता आले असते. मूनचा आकार खूप मोठा असल्याने शास्त्रज्ञही काहीच करू शकत नाहीत.
कॅनडाला परत जाऊ शकणार नाही
जेनी रेसह अनेक शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की मून सध्या आहे, त्या स्थितीत कॅनडाला परत येऊ शकणार नाही. तिने प्रयत्न केल्यास ती वाटेतच मरेल. पण, मूनची चिकाटी पाहून अनेकांनी तिला सलाम केले आहे. पोहायला त्रास होत असतानाही मूनने हजारो किमीचा प्रवास केला, ही खूप मोठी गोष्ट आहे.