वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये शुक्रवारपर्यंत १४ हजारपेक्षा अधिक लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे तसेच या साथीमुळे तिथे २००हून अधिक जणांचा बळी गेला आहे. या साथीला आटोक्यात आणण्याकरिता अमेरिकेतील राजकीय नेते व वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनी कंबर कसली आहे.अमेरिकेमध्ये कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या १४ हजार ३६६वर पोहोचली . तिथे आतापर्यंत २१७ जण मरण पावले. सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या असलेल्या देशांमध्ये अमेरिका सहाव्या क्रमांकावर आहे. अनेक राज्यांमध्ये सध्या लॉकडाऊन सुरू आहे. अमेरिकेतील ५० राज्यांमध्ये ही साथ पसरली आहे. कॅलिफोर्निया हे अमेरिकेतील सर्वात दाट लोकवस्तीचे राज्य आहे. तिथे कोरोनाचा संसर्ग टाळण्याकरिता अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवहार गुरुवारपासून बंद ठेवण्यात आले आहेत. सरकारने दिलेल्या आदेशानुसार तेथील रहिवासी आपल्या घरातूनच सर्व कामे पार पाडत आहेत.ट्रम्प यांनी रद्द केली जी-७ गटाची बैठकजी-७ गटाच्या देशांच्या कॅम्प डेव्हिड येथे जूनमध्ये होणाऱ्या बैठकीला कोरोनाच्या साथीमुळे स्वत: उपस्थित न राहाता, ती बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पार पाडण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीघेतला आहे.जी-७ देशांमध्ये अमेरिका, जपान, ब्रिटनसह युरोपीय समुदाय, इटली, जर्मनी, फ्रान्स, कॅनडा या सात देशांचा समावेश आहे. त्यापैकी इटलीमध्ये कोरोनाने हाहाकार माजविला असून तेथील बळींची संख्या चीनपेक्षा अधिक झाली आहे. अन्य सहा देशांमध्येही कोरोनामुळे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.जी-७ देशांच्या प्रमुखांशी डोनाल्ड ट्रम्प एप्रिल, मे महिन्यामध्येही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोरोनाची साथ, हवामान बदल या विषयांवर संवाद साधतील.
अमेरिकेत १४ हजारांपेक्षा अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 6:52 AM