वॉशिंग्टन : अमेरिकेत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा सातत्याने वाढताना दिसत आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत अमेरिकेत विक्रमी मृत्यू झाले आहेत. येथे 24 तासांत कोरोनामुळे तब्बल 4,491 जणांचा मृत्यू झाला आसून मृतांचा आकडा गुरुवारी 32,917 वर पोहोचला. जगात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. मात्र, अमेरिकेत गुरुवारी 2257 जणांचाच कोरोनामुळे मृत्यू झाला, असे सीएनएनने म्हटले आहे.
सीएनएनने जाहीर केलेले आकडे हे रुग्णालयात झालेल्या मृत्यूंचे आहेत. तर एएफपी या वृत्त संस्थेने मृतांच्या आकड्यांमध्ये अशांचाही समावेश केला आहे, ज्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे, या दोघांच्या आकड्यांमध्ये तफावत दिसून येत आहे.
या संबंधित संख्येचा समावेश पूर्वीच्या संख्येत करण्यात आलेला नव्हता. न्यू यॉर्क शहराने नुकतीच एक घोषणा केली होती. की यात, ज्यांच्या मृत्यूचे कारण कोरोना व्हायरस असण्याचीच दाट शक्यता आहे, अशा 3,778 मृतांचा समावेशही आम्ही एकूण मृतांच्या संख्येत करणार आहोत. अमेरिकेत आतापर्यंत एकूण 6,67,800 हून अधिक जणांचा कोरोनाची लागण झाली आहे.
ट्रम्प यांनी लॉकडाऊन हटवण्याचा प्लॅन सांगितला -अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षडोनाल्ड ट्रम्प यांनी 'ओपनिंग अप अमेरिका अगेन' य नावाने एक प्लॅनदेखील तयार केला आहे. यात तीन टप्प्यांमध्ये शाळा, कार्यालये आणि कंपन्या पुन्हा सुरू केल्या जातील, असे म्हटले आहे. मात्र, असे असले तरी न्यू यॉर्कने गुरुवारीच लॉकडाऊन 15 मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रपती ट्रम्प यांनी तयार केलेला हा प्लॅन सर्व राज्यांच्या गव्हर्नर्सना पाठवण्यात आला असून यावर त्यांचा सल्लाही मागवण्यात आला आहे. तसेच ट्रम्प यांनी या प्लॅनमध्ये हे तीन टप्पे 14 दिवस लागू करणे आणि नंतर पुढील रणनीती ठरवण्याचा सल्लाही दिला आहे.