जपानमध्ये तब्बल 86 हजारांहून अधिक जणांनी वयाची शंभरी ओलांडली असल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी जपानच्या आरोग्य आणि कल्याण मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली. सरकारच्या सर्वेक्षणात जपानमध्ये 86 हजार 510 जणांचे वय 100 अथवा त्याहून अधिक आहे. ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत 6060 ने जास्त आहे. एनएचके वर्ल्डने दिलेल्या वृत्तानुसार, जपानमध्ये सलग 51 व्या वर्षी शतायुषी नागरिकांची संख्या वाढलेली आहे.
जपानमध्ये 100 व त्याहून अधिक वय असलेल्या नागरिकांची संख्या वाढत आहे. या सर्वेक्षणानुसार, वयाची शंभरी पूर्ण केलेल्या या 86 हजार नागरिकांमध्ये महिलांची संख्या ही सर्वाधिक आहे. जवळपास 88 टक्के महिला आहेत. यामध्ये सर्वाधिक वय 118 वर्ष आहे. तर, पुरुषांमध्ये सर्वाधिक वयाच्या व्यक्तीचे वय 111 वर्ष आहे.
जपानमधील शिमाने प्रांतात 100 वर्ष अथवा त्याहून अधिक वय असलेल्यांची संख्या अधिक आहे. या प्रातांत प्रति लाख लोकसंख्येमागे 134.75 जणांचे वय हे 100 व त्याहून अधिक आहे. त्यानंतर कोशी आणि कोगशिमा या प्रांतांचा क्रमांक लागतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.