वॉशिंग्टन : अमेरिकेत नऊ लाखांहून अधिक हिंदी भाषिक आहेत, अशी माहिती तेथील भारतीय दूतावासाने दिली आहे. अमेरिकी तसेच विदेशी नागरिकांना हिंदी भाषा शिकविण्यासाठी या दूतावासातर्फे मोफत वर्गही चालविले जातात.
दरवर्षी १० जानेवारीला विश्व हिंदी दिवस साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील भारतीय दूतावासात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात प्रभारी राजदूत अमितकुमार यांनी सांगितले की, अमेरिकेतील काही शाळांमध्ये हिंदी विषय शिकविला जातो. भारत जगातील संभाव्य महाशक्ती म्हणून पुढे येत आहे. त्यामुळे तेथील भाषा शिकण्यातही अनेक जण रस दाखवू लागले आहेत. भारतात पर्यटन, व्यवसाय किंवा अन्य हेतूंनी प्रवास करणाऱ्यांपैकी अनेक जण हिंदी भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात. या भाषेतून संवाद साधल्यास भारतीयांचे मन जिंकता येईल, अशी त्यांची यामागे भावना असते. चीनमध्ये कार्यरत असतानाचे व चिनी भाषा शिकताना आलेले अनुभव अमितकुमार यांनी या कार्यक्रमातील भाषणात सांगितले. ते म्हणाले की, अमेरिकी, विदेशी नागरिकांना हिंदी भाषा शिकविण्यासाठी चालविण्यात येणाºया वर्गांना चांगला प्रतिसाद मिळतो. भारतीय संस्कृती, साहित्य, तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी हिंदी भाषा शिकायला हवी.
विद्यापीठांचा सहभागविविध देशांतील लोकांना हिंदी भाषा शिकविण्यासाठी वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासात गेल्या दोन वर्षांपासून मोफत वर्ग चालविले जात आहेत. या प्रकल्पात जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठ, जॉर्ज टाऊन विद्यापीठांचाही सहभाग आहे.अमेरिकेतील नव्या पिढीला हिंदी भाषेची ओळख होण्यासाठी एखादा विशेष प्रकल्प राबविण्याचा विचार भारताच्या अमेरिकेतील दूतावासाने चालविला आहे.