ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 20 - आपल्या आसपास वावरणा-या आकर्षक व्यक्तीमत्वांकडे आपण आपसूकच ओढले जातो. आकर्षक व्यक्तीच्या सहवासात वेळ घालवावा असे अनेकांना वाटते. खासकरुन आकर्षक व्यक्तीमत्वाच्या स्त्री-पुरुषांबद्दल एक विश्वास वाटतो. पण आकर्षक व्यक्तीमत्वाचे लोकच फसवणूक करण्याची शक्यता जास्त असते. प्रेम, वैवाहिक नात्यामध्ये आकर्षक व्यक्तीमत्वाच्या स्त्री, पुरुषाकडून धोका होण्याची शक्यता जास्त असते.
एका अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. पर्सनल रिलेशनशिप्सच्या जर्नलमध्ये या अभ्यासचे निष्कर्ष प्रसिद्ध झाले आहेत. प्रेम संबंधात स्थैर्याची कमतरता हे सुद्धा नाते तुटण्याचे एक कारण असते असे हार्वर्ड विद्यापीठाचे संशोधक डॉ. ख्रिस्टीन यांनी सांगितले. संशोधकांनी दोन महिलांसमोर शालेय जीवनातील 238 पुरुषांचे फोटो ठेवले व त्यांना आकर्षक पुरुष निवडण्यास सांगितले.
चेहरेपट्टीवरुन ज्या पुरुषांची आकर्षक म्हणून त्यांनी निवड केली त्यातील अधिक पुरुषांचा घटस्फोट झालेला होता किंवा विवाह फार काळ टिकू शकला नव्हता. त्याचप्रमाणे या दोन महिलांना हॉलिवूड सेलिब्रिटीची निवड करण्यास सांगितले. त्यातील ज्या हॉलिवुड सेलिब्रिटींना या महिलांनी निवडले त्यांचे लग्न किंवा प्रेमसंबंध मोडलेले होते. शारीरीक आकर्षणापायी फसवणुकीचे जास्त प्रकार घडतात असे निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे.