काठमांडू : परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आपल्या तीनदिवसीय नेपाळ दौऱ्याला अपेक्षेहून अधिक यश आल्याचे सांगितले. त्यांच्या या दौऱ्यात उभय देशांतील व्यापार करार मसुद्याला अंतिम रूप देणे आणि बदलत्या संदर्भात १९५० च्या ऐतिहासिक शांतता व मैत्री कराराचा आढावा घेण्यावर सहमती झाली.मायदेशी रवाना होण्यापूर्वी काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांनी रविवारी पत्रकारांशी बातचीत केली. त्या म्हणाल्या, ‘मी नेपाळ दौऱ्याबाबत खूप समाधानी आहे. खूप आशा-अपेक्षांसह मी येथे आले होते आणि यास अपेक्षेहून अधिक यश आले. या दौऱ्याने द्विपक्षीय संबंध बळकट होतील आणि यासाठी एक रूपरेषा तयार केली आहे.’ भारतातील नव्या सरकारसोबत दोन्ही देशांतील बहुआयामी परस्पर संबंधांना ‘नवी गती’ देण्याची इच्छा नेपाळने व्यक्त केली. दोन्ही देशांनी अनेक अडचणी दूर केल्या आहेत आणि अनेक महत्त्वपूर्ण क्षेत्रांत सहकार्य वाढीवर सहमती झाली आहे. स्वराज यांनी राष्ट्राध्यक्ष राम बरन यादव आणि पंतप्रधान सुशील कोईराला यांच्यासह प्रमुख नेपाळी नेत्यांशी बातचीत केली. विरोधी पक्षनेते व युनायटेड कम्युनिस्ट पार्टी आॅफ नेपाळ-माओवादीचे प्रमुख प्रचंड यांचीही भेट घेतली.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या ३ आॅगस्ट रोजी दोनदिवसीय नेपाळ दौऱ्यावर जाणार आहेत. परराष्ट्रमंत्र्यांच्या या दौऱ्याने यास पार्श्वभूमी तयार होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. इंद्रकुमार गुजराल यांच्यानंतर नेपाळ दौऱ्यावर जाणारे मोदी हे पहिले पंतप्रधान ठरतील. १९९७ साली गुजराल हे नेपाळ दौऱ्यावर गेले होते. संरक्षण, सुरक्षा, व्यापार व ऊर्जा यासारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रांत सहकार्य वाढविण्यावर उभय नेत्यांमध्ये सहमती झाली. संयुक्त आयोगाच्या बैठकीत २६ मुद्यांवर सहमती झाली. ऊर्जा व्यापार कराराच्या मसुद्यास लवकरात लवकर अंतिम रूप देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. (वृत्तसंस्था)
नेपाळ दौऱ्याला अपेक्षेहून अधिक यश
By admin | Published: July 28, 2014 2:36 AM